मुंबई : अयोध्येतील धन्नीपूर येथे भव्य मशिदीच्या उभारणीचे काम सुरू करण्यात येणार असून त्यासाठी महाराष्ट्रातून पहिली वीट हाजी अरफात शेख यांनी दिली. मशिदीच्या पायाभरणीचा कार्यक्रम हाजी अरफात शेख यांच्या पुढाकाराने मुंबईतील रंगशारदा हॉलमध्ये झाला. कार्यक्रमात मशिदीचे नाव व पहिले छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले.
सलामती पीर दर्गा ट्रस्ट आणि सुन्नी वक्फ बोर्ड ऑफ इंडियाच्या पुढाकाराने अयोध्येच्या धन्नीपूरमध्ये ‘मुहम्मद बिन अब्दुल्ला’ या नावाने मशीद बांधण्यात येईल, असे हाजी अरफात शेख यांनी सांगितले.
त्यांच्याच अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्ड अध्यक्ष जफर फारुकी साहब, मौलाना अब्दुल्लाह इबनुल क़मर -अल हुसैनी, मुफ्ती अजीजुर रेहमान फतेपुरी, सूफी लासानी पीर बिजापुरी, सुफी तरक्की पीर, सुफी फैहमी पीर, मौलाना अश शाह कादरी देवबंद, डॉ. हाबील खुराकिवाला, डॉ. आबिद सय्यद, मशिदीचे आर्किटेक इम्रान शेख यासह विद्वान, पीर, मौलाना सहभागी झाले.
या मशिदीत नमाज पठण करून इबादत करता येईल. ९ हजारांहून अधिक लोक एकत्र नमाज अदा करू शकतील. ४ हजार महिलांना नमाज अदा करण्यासाठी वेगळी व्यवस्था असेल. मशिदीचे प्रमुख ५ द्वार अनोख्या पद्धतीने बांधले जातील, मिनार ३०० फुटांपेक्षा उंच असेल. ही मशीद भारतातील सर्व मशिदीपेक्षा मोठी व आकर्षक असणार आहे.
याच्या उभारणीसाठी हाजी अरफात शेख यांनी सर्व मुस्लिमांना एका छत्रछायेखाली एकत्र आणले आणि अयोध्येत अशी मशीद बांधली जाऊ शकते हे सिद्ध केले. त्यामुळे या दिवसाची देशाच्या इतिहासात नोंद केली जाईल, असे व्यासपीठावरील अनेकांनी बोलताना सांगितले.
मशीद परिसरात सर्व धर्माच्या रुग्णांवर मोफत उपचारांसाठी कॅन्सर हॉस्पिटल बांधले जाणार आहे. तसेच लॉ कॉलेज, मेडिकल कॉलेज, इंजिनीअरिंग कॉलेज, आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स कॉलेजची इथे उभारणी केली जाणार आहे. गरजू विद्यार्थ्यांच्या ना स्कॅा स्कॅालरशिप व शिक्षणाची जबाबदारी वोक्हार्ट हॉस्पिटलने घेतली आहे. गर्भवती महिलांसाठी हॉस्पिटलची निर्मिती केली जाईल. महिलांसाठी स्वतंत्र महाविद्यालयही असेल. सर्वोच्च न्यायालयाने सदर बांधकामासाठी ५ एकर जमीन दिली आहे. मात्र प्रकल्पासाठी आणखी जागेची आवश्यकता असल्याने स्वतःचे पैसे टाकून आणखी ६ एकर जमिनीची खरेदी केली जाणार आहे. हाजी अरफात शेख, उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्ड अध्यक्ष जफर फारुकी साहब, मौलाना अब्दुल्लाह इबनुल क़मर -अल - हुसैनी यांच्या देखरेखीखाली हा प्रकल्प उभा करण्यात येणार आहे.
मशिदीला नाव ‘मोहम्मद बिन अब्दुल्ला’वादग्रस्त ठरलेल्या बाबरी मशीद या नावाऐवजी ‘मोहम्मद बिन अब्दुल्ला’ हे नाव मशिदीला देण्यात आले आहे. ‘मोहम्मद बिन अब्दुल्ला’ हे प्रॉफिट हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचे वडील होते. त्यांच्याच पवित्र नावावरून मशिदीला नाव दिल्याने शेजारील शत्रू देशाला ही एक प्रकारची चपराक आहे, असे हाजी अरफात शेख यांनी भाषणात सांगितले.