ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ४ - सतत आजारी पडते आणि खर्च काढते म्हणून वैतागलेल्या आजीने स्वत:च्या तीन महिन्यांच्या नातीचा घरातील पाण्याच्या बॅरलमध्ये बुडवून खून केला. खळबळ उडवून देणारी ही घटना मंगळवारी सकाळी नऊ ते साडेनऊच्या दरम्यान कोंढव्यामध्ये घडली. मुलीला पळवल्याचा बनाव रचणा-या आजीला पोलिसांनी ‘बोलते’ करुन ही घटना उघडकीस आणली. खून झालेल्या मुलीचे नावही ठेवण्यात आलेले नव्हते.
सुशिला संजय तारु (वय 50, रा. अतुरनगर सोसायटी, बी-1, फ्लॅट क्रमांक 13, कोंढवा) असे अटक आजीचे नाव आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक किरण पावसे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुशिला या पती संजय, मुलगा राजीव आणि सून मोनिका यांच्यासह राहतात.
मुळचे खडकवासला येथील रहिवासी असलेले हे कुटुंब चार महिन्यांपुर्वी अतुरनगर सोसायटीमध्ये राहण्यास आले आहे. राजीव जमीन मोजणीची कामे करतात. राजीव आणि मोनिका यांना तीन महिन्यांपुर्वी मुलगी झाली होती. जन्मत:च तिच्या बेंबीमध्ये इन्फेक्श्न झाले होते. त्यामुळे बेंबीमध्ये सतत पस होऊन रक्तस्त्राव होत असे. काही दिवसांपुर्वी तिला रुग्णालयात दाखल केले होते.
उपचारानंतर बाळाला घरी आणण्यात आले. तेव्हा ती सतत रडत असायची. त्यामुळे एका महिलेकडून मालिश करुन घेण्यात आली. मालिश केल्यानंतरही तिचे रडणे थांबत नव्हते. त्यामुळे हडपसर येथील एका खासगी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. त्यावेळी तिच्या डोक्याला सूज आलेली होती. तसेच पाय पुर्णपणे अधू झालेला होता. पायाला बेल्ट लावून उपचार करुन बाळाला घरी सोडले होते. बाळाच्या सततच्या आजारपणाला आणि त्यामुळे येणा-या खर्चाला आजी सुशिला वैतागली होती. याबाबत ती सतत घरामध्ये बडबड करीत असे.
मंगळवारी सकाळी राजीव अंघोळीकरिता मोरीत गेले होते. तर मोनिका या टॉयलेटमध्ये गेलेल्या होत्या. नेमकी हीच वेळ साधत सुशिला हिने बाळाला उचलून दुस-या बेडरुममध्ये नेले. या बेडरुममधील पाण्याच्या बॅरलमध्ये बाळाला बुडवून ती बाहेरच्या खोलीमध्ये येऊन बसली. थोड्या वेळाने स्वत:च आरडाओरडा करायला सुरुवात केली. सोसायटीमध्ये आलेल्या दोन महिलांनी बाळाला हिसकावून नेल्याचा कांगावा तिने करायला सुरुवात केली.
घरातील सर्व जणांनी आजुबाजुच्या परिसरात बाळाचा शोध घेतला. मात्र, मुलगी आढळून आली नाही. तातडीने याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनास्थळावर पोलीस दाखल झाले. त्यांनी सर्वांकडे चौकशी करायला सुरुवात केली.
पोलिसांना आजीच्या जबाबामुळे संशय आला. दरम्यान, घरातील सर्वांनी सुशिला यांच्याकडे चौकशी केली. मात्र, ती कबुली देत नव्हती. शेवटी पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली. बेडरुममधील तिने दाखवलेल्या बॅरलमध्ये पाण्यात बुडालेला बाळाचा मृतदेह पोलिसांनी बाहेर काढला. सुशिला हिला अटक करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विशाल वळवी करीत आहेत.
‘ताई खरंच सांग तु बाळाचे काय केलेस? तुच तिचा खून केलास ना. मी आता माझा हातच तोडून टाकतो, तुझ्याकडून मी कधीच राखी बांधून घेणार नाही’ या काळजाला हात घालणा-या शद्बात आरोपी सुशिलाच्या भावाने आपला राग आणि दु:ख व्यक्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. बाळाचे फोटो आणि प्रत्यक्ष मृतदेह पाहून महिला पोलिसांच्याही डोळ्यात पाणी आले होते.