मुंबई : महाराष्ट्रात त्वचा (स्कीन), ऊती (टिश्यू) आणि नाळ (प्लासंटा) या अवयवांचेही प्रत्यारोपण करण्यास मान्यता देण्याकरिता मानवी अवयव प्रत्यारोपण अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. एखाद्या रुग्णाला अवयवदान करण्याकरिता यापुढे त्याचे आजी-आजोबाही पुढे येऊ शकतात, अशी तरतूद यात केली. केंद्र सरकारने २०११मध्ये मानवी अवयव प्रत्यारोपण अधिनियम लागू केला. केंद्राच्या धर्तीवर तो लागू करण्यास राज्याने मान्यता दिली. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मानवी अवयव प्रत्यारोपण अधिनियम स्वीकारण्याबाबतचा ठराव दोन्ही सभागृहांत मंजूर झाल्यावर महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी सुरू होईल, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.मूत्रपिंड, हृदय, यकृत यांच्या प्रत्यारोपणाबरोबरच त्वचा, ऊती, नाळ यांचे प्रत्यारोपण करण्यासही मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आता ज्यांना शरीराच्या या अवयवांचे दान करायचे असेल ते त्याकरिता नोंदणी करू शकतील. एखाद्या रुग्णाला एखादा अवयव दान करायचा असेल तर ‘जवळचे नातलग’ या व्याख्येत आई-वडील आणि भाऊ-बहीण यांचाच समावेश होता. यापुढे दोन्हीकडील आजी-आजोबा हेही आपल्या नातवाला किंवा नातीला अवयवदान करून जीवदान देऊ शकतील. अवयवदानाची प्रक्रिया सुलभ व्हावी याकरिता इस्पितळात प्रत्यारोपण समन्वयक (ट्रान्सप्लान्ट कोआॅर्डीनेटर)ची नियुक्ती करणे बंधनकारक करण्यात आले आहे.संमतीखेरीज जर त्याचे अवयव काढून घेतले तर पाच वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा आणि १० हजार रुपये दंड अशी कारवाई करण्याची तरतूद केलेली आहे.
आजी-आजोबाही करू शकतील अवयवदान!
By admin | Published: August 05, 2015 2:23 AM