मुंबई : राज्यात नाफेडच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे संपूर्ण चुकारे ७ जूनपर्यंत देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. तसेच शासनाकडून अद्याप खरेदी न करता आलेल्या तूर व हरभºयासाठी प्रति क्विंटल एक हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.तूर आणि हरभरा खरेदी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात बैठक घेतली. राज्याने खरेदी केलेल्या तूर साठ्यातून सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून पॅकेजिंग पद्धतीने तूरडाळ उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. नाफेडच्या मागणीनुसार राज्यात कृषी उत्पादनांच्या साठवणुकीसाठी गोदाम उभारणीसाठी जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देशही फडणवीस यांनी यावेळी दिले. हरभरा खरेदीला केंद्र सरकारकडून १३ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. खरीप हंगाम २०१७-१८ मध्ये तूर व हरभºयाची हमी भावाने विक्री करण्यासाठी आॅनलॉइन पद्धतीने एनईएमएल या पोर्टलवर नोंदणी झालेल्या मात्र, नाफेडच्या वतीने खरेदी न झालेल्या तूर व हरभरा उत्पादकांना प्रति क्विंटल एक हजार रुपयांच्या मर्यादेत अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला.
तूर, हरभऱ्यासाठी हजार रुपये अनुदान; खरेदीसाठी मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 2:51 AM