ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. २८ - गाव हगणदरीमुक्त करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशननेएक अनोखा उपक्रम सुरू केला असून, शौचालय नसलेल्या कुटुंबांना यापुढे ग्रामपंचायतीचा कोणताही दाखला देताना त्यावर लाल शिक्का मारण्यात येणार आहे. या दाखल्यावर विना शौचालय असे लिहिलेले राहणार आहे.
घरोघरी शौचालय बांधकाम करून त्याचा वापर करण्यासंदर्भात वाशिम जिल्हा परिषदेने जनजागृतीची मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून, शौचालय नसणाऱ्या कुटुंबियांना शौचालय बांधकाम करण्याचे आवाहन केले जात आहे. यासोबतच अशा कुटुंबाला ग्रामपंचायतीचा कोणताही दाखला देताना, त्यावर लाल शिक्का मारून विना शौचालय लिहिले जाणार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी लोकमतशी बोलताना संगितले.
स्वच्छता कक्षाने दोन प्रकारचे शिक्के बनविले आहेत. ग्रामपंचायतीकडून देण्यात येणाऱ्या प्रत्येक कागदपत्रांवर हे शिक्के मारण्यात येणार आहेत. ज्यांच्याकडे वापरातील शौचालय आहे त्यांना हिरव्या रंगातील शौचालयासह असा शिक्का मारण्यात येणार आहे. ज्या कुटुंबाकडे शौचालय नाही व जे कुटुंब उघड्यावर शौचास जातात त्यांच्या कागदपत्रांवर लाल रंगातील शिक्का मारण्यात येईल. जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींना अशा प्रत्येकी दोन शिक्क्यांचे व एका पॅडचे वितरण करण्यात आले असून याबाबत सर्व गटविकास अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत, असे स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी सांगितले.