विलास भेगडे,तळेगाव दाभाडे- इंदोरी-सोमाटणे गट या भाजपाच्या बालेकिल्ल्यात विजयाची खात्री असल्याने पक्षाकडून अनेक दिग्गज उमेदवारांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्याने भाजपा पक्षश्रेष्ठींपुढे पेच पडला होता. पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य व वराळे गावचे माजी सरपंच नितीन मराठे यांना उमेदवारी देऊन संभाव्य बंडखोरी टाळण्यात भाजपाला यश आले. मराठे यांची या गटातील नातीगोती व कार्यकर्त्यांचे सांघिक प्रयत्न यामुळे भाजपाचा हा गड अभेद्य राहिला आहे. गटात चौथ्यांदा भाजपाचे कमळ फुलले. सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित झाल्यामुळे मिनी आमदारकी म्हणून गटाकडे पहिल्यापासूनच पाहिले गेले. राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस व माजी सभापती विठ्ठल शिंदे या अनुभवी व अभ्यासू उमेदवारास निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. मात्र राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या अंतर्गत छुप्या बंडखोरीमुळे येथे भाजपा व राष्ट्रवादीमधील चुरशीचा सामना पहावयास मिळालाच नाही. छुप्या बंडखोरीमुळे उमेदवार कसा हतबल होऊ शकतो, ते या गटात दिसले. मराठे यांना १२ हजार २७५ मते तर शिंदे यांना ९ हजार ७५२ मते मिळाली. २ हजार ५२३ च्या मताधिक्याने विजय संपादीत करीत मराठे यांनी भाजपाचा हा गड कायम राखला. मागील तीन निवडणुकीत भाजपच्या सुमित्रा जाधव, प्रशांत ढोरे व सविता गावडे यांनी गटाचे प्रतिनिधित्व केले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे व माजी आमदार दिगंबर भेगडे यांनी गट प्रतिष्ठेचा केला होता. प्रचारयंत्रणेत सुसुत्रता होती. पालकमंत्री गिरीश बापट यांची गटात सभा झाली. याचाही चांगलाच फायदा झाला. शिंदे हे इंदोरीगावचे माजी सरपंच. शिंदे हे पूर्वाश्रमीचे भाजपाचे. इंदोरी गणातून त्यांनी पंचायत समितीवर प्रतिनिधित्व केले आहे. शिंदे यांनी येथे भरपूर विकासकामेही केली. कॉँग्रेस व शिवसेनेचा उमेदवार नसल्याचा फायदा राष्ट्रवादीला होईल असे शिंदे समर्थकांना वाटत होते. राष्ट्रवादीच्या एकाही वरिष्ठ नेत्याची सभा या गटात झाली नाही तरी भाजपच्या पारंपरिक बालेकिल्ल्यात शिंदे यांना मिळालेल्या मतांकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. शिवसेना व कॉँग्रेस पक्षाला या गटात उमेदवार उभा करता आला नाही. भाजपाचा प्रभाव असलेल्या बहुतेक गावांमधून मराठे यांना मताधिक्य मिळाले. रवींद्र किसन गायकवाड या अपक्ष उमेदवारास नगण्य मते मिळाली. सुमारे दोन हजार मताधिक्यांनी मराठे हे वराळे गावातून पुढे आहेत. पहिल्या फेरीपासूनच ते आघाडीवर होते. (वार्ताहर)>इंदोरी गणात कमळ : सोमाटणेत मात्र धक्काभाजपा व आरपीआय (ए) युतीचे उमेदवार ज्योती शिंदे यांना इंदोरी गणातून ५ हजार ५९२ मते मिळाली. तर प्राजक्ता आगळे यांना ३ हजार ३०६ मते मिळाली. ज्योती शिंदे या २ हजार २८६ च्या मताधिक्यांनी विजयी झाल्या. इंदोरी गणातील भाजपाने ही जागा कायम राखली आहे.सोमाटणे गणातून राष्ट्रवादी कॉँग्रेस व स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार साहेबराव कारके हे ३८८च्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. त्यांना ५ हजार ५६६ मते मिळाली. भाजपचे उमेदवार उमेश बोडके यांना ५ हजार १७८ मते मिळाली. या निवडणुकीत नव्याने निर्माण झालेल्या सोमाटणे गणात भाजपाला पराभवास सामोरे जावे लागले आहे. यामुळे भाजपाची हक्काची एक जागा कमी झाली आहे. हा पराभव भाजपाच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. मतदारांनी येथे भाजपाला का नाकारले याचे आत्मचिंतन करण्याची वेळ भाजपा पक्षश्रेष्ठींवर आली आहे.
नातीगोती, सामूहिक प्रयत्नामुळे यश
By admin | Published: February 27, 2017 12:30 AM