गेवराई : येथील तहसीलदारांच्या संकल्पनेतून व लोकसहभागाने शहराजवळील उजाड पालख्या डोगरावर शनिवार, रविवार, सोमवार असे ३ दिवसांपासून तीनशे युवकांसोबत २ क्विंटल विविध प्रकारच्या बियांचे बीजारोपण करण्यात आले. यावेळी शहरातील, आजुबाजूच्या ग्रामीण भागातील नागरीक सहभागी झाले होते. चार वर्षांपासून तालुक्यात दुष्काळ असल्याने व तीव्र पाणीटंचाई भासत असताना याची जाणीव ठेवून व पर्यावरणाचा समतोल राहावा, हरित गेवराई करण्याकरीता तहसीलदार संजय पवार यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली पालख्या डोंगरावर वनराई करण्यासाठी तीनशे युवक व नागरिक यांच्यासोबत गेल्या तीन दिवसांपासून येथील पालख्या डोंगरावर हातात टिकाव व बिजे घेवून बीजारोपणाच्या कार्यक्रमात सहभाग घेत असून, यात तीन दिवसांत तीनशे युवक हातात कुदळ व बिया घेवून डोंगरावर जावून स्वत: खड्डे खोदून दोन क्विंटल करंजी, चिंच, काशीद, हिरडा, भरडा, गुलमोहरसह अनेक झाडांच्या बियांचे बीजारोपण करण्यात आले. यावेळी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, तलाठी, मित्रमंडळ, मेडीकल संघटना, विविध क्रीडा मंडळे, प्रतिष्ठाणचे युवक मोठ्या संख्याने सहभागी झाले होते. हा बीजारोपणाचा कार्यक्र म अनेक दिवस चालणार असून संपूर्ण पालख्या डोंगरावर बीजारोपण हिरवळ निर्माण करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. (वार्ताहर)
गेवराईत दोन क्विंटल बियांचे केले रोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2016 11:20 PM