अमळनेर : भाविकांचा अपूर्व उत्साह, ढोल-ताशांचा निनाद, टाळमृदुंगाचा गजर व पांडुरंग हरी, विठ्ठल हरी, संत सखाराम महाराजांचा जयघोष, अशा भक्तिमय वातावरणात वाडी संस्थानतर्फे आज रथोत्सव साजरा झाला. खान्देशचे भूषण असलेल्या या रथाचे शहरात ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. वाडी संस्थानचे गादीपती प्रसाद महाराज व रथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांचा जनसागर लोटला होता. १८२५ पासून सुरू झालेली रथोत्सवाची परंपरा आजही टिकून आहे. आज सायंकाळी रथ पश्चिम दिशेला वळविण्यात आला. सनईच्या मंगलवाद्यात लालजींची मूर्ती वाडी संस्थानातून आणण्यात आली. रात्री ७.५० वाजता रथावर श्री लालजींची हातात धनुष्यबाण घेतलेली मूर्ती विराजमान करण्यात आली. केशव पुराणिक यांनी सपत्नीक रथाची विधिवत पूजा केली. प्रसाद महाराजांतर्फे मान्यवरांना नारळाचा प्रसाद दिला. त्यानंतर बेलदार समसोद्दीन शेख चिरागोद्दीन व बेलदार सलीम कमरोद्दीन यांनी रथाला लावलेली मोगरी काढली आणि पांडुरंगाचा आणि संत सखाराम महाराजांचा जयघोष करीत रात्री ७.३० वाजता रथ जागेवरून हलला. रथाच्या अग्रभागी परंपरागत बैलगाडी होती. त्यानंतर निशाणधारी घोडेस्वार, पाठोपाठ मोहन बेलापूरकर महाराजांची दिंडी होती. दिंडीच्या मागे रथ होता. रथाच्या मागे आद्य सखाराम महाराजांच्या पादुका होत्या. मेण्याच्या मागे स्वत: प्रसाद महाराज रथाचे नियंत्रण करीत होते. रथावर नारळाची तोरणे, केळीचे खांब, आंब्याची तोरणे बांधण्यात आली होती. वाडी संस्थानातून निघालेला रथ दगडी दरवाजामार्गे मार्गस्थ होत होता. रथ बघण्यासाठी जिल्ह्यासह महाराष्टÑातून भाविक अमळनेरात दाखल झालेले होते. रथ मार्गावर जागोजागी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. ठिकठिकाणी पानसुपारीचे कार्यक्रम झाले. या वेळी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्षा जयश्री पाटील, उपनगराध्यक्ष डॉ.राजेंद्र पिंगळे, कृउबा सभापती अनिल पाटील, शिरीष चौधरी, प्रांताधिकारी तुकाराम हुलवळे, तहसीलदार आशा गांगुर्डे, न्यायाधीश बारावकर, न्यायाधीश अग्रवाल, न्यायाधीश गुलाब पाटील आदी उपस्थित होते. नयनरम्य आतषबाजी बोरी नदीच्या पुलावर रथ पोहचल्यानंतर नदीपात्रात विविध फटाक्यांची नयनरम्य आतषबाजी करण्यात आली होती. पोलीस बंदोबस्त रथोत्सवात उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक अशोक पवार, पीएसआय पंडित वाडिले, पीएसआय काझी यांच्यासह जवळपास २०० पोलीस कर्मचारी चोख बंदोबस्त ठेवून होते. (वार्ताहर)
पांडुरंगाच्या जयघोषाने संत नगरी दुमदुमली
By admin | Published: May 11, 2014 12:46 AM