लोकमत न्यूज नेटवर्क-- पाचगणी : सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक भिकू दाजी भिलारे ऊर्फ भि. दा. भिलारे गुरुजी यांचे बुधवारी पहाटे तीन वाजता मुुंबई येथे निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. महाबळेश्वर तालुक्यातील भिलार या गावी दुपारी तीन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, पाच मुली, सुना, पुतणे, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे.२६ नोव्हेंबर १९१९ रोजी भिलार येथील मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या भि. दा. भिलारे गुरुजी यांनी सातवीपर्यंतचे शिक्षण घेऊन त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. (पान ७ वर)त्यातूनच ते स्वातंत्र्यप्राप्तीसाठी भूमिगत चळवळीकडे ओढले गेले.गांधीजींनी देशातील तरुण वर्गाला स्वातंत्र चळवळीमध्ये उडी घेण्याचे आवाहन केल्यानंतर भिलारे गुरुजींनी स्वत:ला स्वातंत्र्य चळवळीत झोकून दिले. थोर नेत्यांच्या सहवासामुळे गुरुजींना सहकार शिक्षण आणि समाजकारण या क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळाली.त्यांनी महाबळेश्वर, वाई व जावळी तालुक्यांतील ९३ गावांचा ग्रामोन्नती संघ स्थापन करून अनिष्ठ रुढी, अंधश्रद्धा आणि अस्पृश्यता निवारणाचे कार्य त्यांनी केले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या जडणघडणीत गुरुजींचा सिंहाचा वाटा होता. १९६२ ते १९७२ या कालावधीत ते जावळीचे आमदार होते. १९७८ ते १९८० या कालावधीत त्यांनी विधानपरिषदेचे सदस्यपद भूषविले. महाराष्ट्र राज्य प्रांतिक काँग्रेस कमिटीचे ते ४० वर्षे सदस्य होते. अलीकडच्या काळातही अनेक आमदार, खासदार हे भिलारे गुरुजींच्या मार्गदर्शन घेऊनच आपले कामकाज करीत असत. भिलारची माती पोरकी...भिलारची माती आज या गुरुजींच्या जाण्यामुळे पोरकी झाली आहे. भिलारे गुरुजींचे सर्व राजकीय लोकांशी सलोख्याचे संबंध होते. पाचगणी, महाबळेश्वरात येणारी प्रत्येक राजकीय व्यक्ती भिलारमध्ये येऊन भिलारे गुरुजींना न भेटता कधीच जात नसत.गांधीजींच्या हत्येचा कट उधळला१९४४ मध्ये महात्मा गांधी पाचगणीत आले असताना प्रार्थनेच्या वेळी नथुराम गोडसे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला हल्ला परतविण्यात भिलारे गुरुजी आघाडीवर होते. हल्ल्यासाठी पुढे आलेल्या व्यक्तीच्या हातातील सुरा हिसकावून घेतला व गांधीजींचा पाचगणीत होणारा हत्येचा कट भिलारे गुरुजींनी उधळवून लावला होता. महात्मा गांधी यांच्या हस्ते गुरुजींचा सत्कारगुरुजींच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्याकरिता महात्मा गांधी हे महाबळेश्वर येथे आले व त्यांनी गुरुजींचा गौरव केला होता.
थोर स्वातंत्र्यसैनिक भिलारे गुरुजी यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:01 AM