मुंबई - ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक डॉ. रणजितसिंह डिसले यांना आणखी एक मोठा सन्मान मिळाला आहे. डिसले गुरुजींना देशाचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या कुटुंबीयांकडून देण्यात येणारा डॉ. एपीजे अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया हा पुरस्कार जाहीर झाला आहे. स्वत: डिसले गुरुजी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
तंत्रज्ञानामधील अभिनव प्रयोगामुळे हा पुरस्कार डिसले गुरुजींना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आनंद व्यक्त करताना केलेल्या ट्विटमध्ये डिसले गुरुजी म्हणाले की, खरंतर ज्यांनी आमच्या पिढीला मोठी स्वप्न पहायला शिकवलं असे आदरणीय डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या परिवाराकडून दिला जाणारा पुरस्कार स्वीकारताना अतिशय आनंद होतोय. या पुरस्काराने माझ्यावरील जबाबदारी वाढवली हे मात्र निश्चित.
दरम्यान, डिसले गुरुजी हे फुलब्राईट स्कॉलरशिपसाठी ८ ऑगस्ट रोजी अमेरिकेत जाणार आहेत. डिसले गुरुजींना अमेरिकन सरकारची प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप जाहीर झाली होती. या स्कॉलरशिपच्या माध्यमातून ते अमेरिकेमध्ये सहा महिने अभ्यास करणार आहेत.