मुंबई : नागपूर-मुंबई महाराष्ट्र समृद्धी द्रुतगती महामार्ग हा सर्वांसाठी समृद्धीचा आणि राज्याच्या खऱ्या अर्थाने प्रगतीचा महामार्ग ठरणार असून, त्यामुळे २0 लाख लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. तो आॅक्टोबर २0१९ पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देशभरातील राष्ट्रीय महामार्ग याला जोडले जाणार असून, त्यामुळे महाराष्ट्र देशातील सर्वाधिक पुढारलेले राज्य बनेल, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केला. नागपूर ते मुंबई हे सुमारे ७१0 किलोमीटरचे अंतर वाहनांना ताशी १५0 किलोमीटर वेगाने अवघ्या सहा तासांत पूर्ण करता येईल. मुख्य म्हणजे त्यावर कोठेही टोल आकारला जाणार नाही आणि त्याच्या दोन्ही बाजूंनी सर्व पायाभूत सोयी असतील. मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी सर्व संपादकांपुढे या महामार्गाचे प्रेझेंटेशन करताना संपूर्ण प्रकल्पाची सविस्तर माहितीही दिली.या महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी विकत न घेता, या प्रकल्पातच त्यांना थेट सहभागी करून घेतले जाणार आहे. त्यामुळे ते प्रकल्पाचे भागीदार बनणार असून, त्यात त्यांचा अधिक फायदा होणार आहे. या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची बागायती जमीन गेल्यास त्याला जमिनीच्या क्षेत्रफळाच्या ३0 टक्के आकाराचा विकसित भूखंड सर्व सुविधांसह मिळेल, तर कोरडवाहू जमीन असल्यास शेतकऱ्याला त्याच्या २0 टक्के आकाराचा भूखंड सर्व सोयींसह दिला जाईल. याखेरीज त्याला १0 वर्षांपर्यंत दरवर्षी विशिष्ट रक्कम अनुदान म्हणून मिळेल आणि त्यात दरवर्षी १0 टक्के वाढ होईल. एखाद्या शेतकऱ्याने महामार्गासाठी दिलेल्या जमिनीची रक्कम मागितली, तर त्याला ९ टक्के व्याजाने ती दिली जाईल. परिणामी शेतकऱ्यांचे या प्रकल्पामुळे नुकसान न होता फायदाच होणार आहे, असे फडणवीस म्हणाले.चीन, दक्षिण कोरिया आणि मलेशियाने नागपूर ते मुंबई हा महामार्ग बांधून देण्याची तयारी आहे. तसेच त्यासाठी अपेक्षित असलेला ४६ हजार कोटींचा निधी उभारण्यात कोणतीही अडचण नाही. अनेक कंपन्यांनी निधी देण्याची तयारी दर्शवली आहे, असे सांगून ते म्हणाले की, एका कंपनीने त्या महामार्गावर प्रचंड सॉफ्टवेअर इंडस्ट्री उभी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याखेरीज देश-परदेशांतील अनेक कंपन्यांनी तेथे स्वत:हून आपले प्रकल्प उभे करण्याची तयारी दर्शवली असून, त्यामुळे नागपूर-औरंगाबाद-मुंबई या संपूर्ण पट्ट्यात अनेक उद्योग उभे राहतील, लाखो रोजगार निर्माण होतील. परिणामी शहरीकरणाला बऱ्याच प्रमाणात आळा बसेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हा महामार्ग दोन्ही बाजूंनी तीन (अधिक एक) लेनचा म्हणजे एकूण सहा लेनचा असेल. शिवाय दोन्ही बाजूंच्या मध्यभागी भरपूर मोकळी जागा सोडलेली असेल. संकट काळात एखाद्या विमानाचे लँडिंग सहज करता येईल, अशी त्याची रुंदी असेल. शिवाय महामार्गाच्या मध्ये येणाऱ्या गावांचा वा गावांना अडथळा येऊ नये, यासाठी उड्डाणपूल वा सबवे असतील. दहा जिल्ह्यांतील ३0 तालुके आणि ३५४ गावांतून जाणाऱ्या या महामार्गाच्या बाजूने अनेक टाऊनशिप, महाविद्यालये, रुग्णालये, रेस्टॉरंट्स, ट्रॉमा सेंटर्स, आयटी हब, शेती व अन्न प्रक्रिया केंद्रे, पर्यटनस्थळे, लहान व मोठे उद्योगधंदे, औद्योगिक वसाहती अशा अनेक गोष्टी असतील. त्यामुळे नागपूर तसेच मधील सर्व ठिकाणी तयार होणारी उत्पादने यांचे मुंबई, नवी मुंबईतून निर्यात करणे खूपच सोपे होईल. (प्रतिनिधी)>आंध्र प्रदेशपेक्षा वेगळा फॉर्म्युला : आंध्र प्रदेशने त्या राज्यातील अमरावतीमध्ये राजधानी उभी करण्याचे ठरवताना शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी घेतल्या, त्यांना एकदाच जादा मोबदला दिला. पण महाराष्ट्राने प्रकल्पात भागीदारी दिली असून, हा देशातील पहिला प्रयोग आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रत्यक्षात आंध्रातील शेतकऱ्यांपेक्षा जादा रक्कम मिळणार आहे.
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गामुळे राज्याची मोठी प्रगती
By admin | Published: August 27, 2016 5:18 AM