गडचिरोली - नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांकडून नक्षलवाद्यांविरोधात राबण्यात येणाऱ्या अभियानाला आज मोठं यश मिळालं आहे. आज सकाळपासून जिल्ह्यातील उत्तर-पूर्व भागातील छत्तीसगड सीमेजवळील परिसरात सुरू असलेल्या चकमकीत तब्बल २६ नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले आहे. या चकमकीमध्ये नक्षलवाद्यांचा एक मोठा नेता मारला गेल्याचीही चर्चा आहे. मात्र त्याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.
गडचिरोलीमधील छत्तीसगडच्या सीमेवर आज सकाळपासूनच चकमकीला सुरुवात झाली होती. या चकमकीमध्ये पोलिसांनी नक्षलवाद्यांना घेरून नक्षलवाद्यांचे शिबिर उद्ध्वस्त केले. यावेळी झालेल्या गोळीबारात तब्बल २६ नक्षलवादी ठार झाले. तर सुरक्षा दलांचे चार जवान जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी नागपूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ठार झालेल्या २६ नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत. मात्र मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
ग्यारापत्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोरची तालुक्यातील टेक्केमेटा, मर्दानटोला पहाडाच्या परिसरात नक्षल्यांचे शिबिर लागले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या सी-६० पथकाच्या जवानांनी नियोजनबद्धरीत्या त्या ठिकाणी अभियान सुरू केले. पोलिसांच्या पथकाची चाहूल लागताच नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. मात्र पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देत नक्षल्यांच्या दिशेने कूच केल्याने ते हतबल झाले. या चकमकीत पोलिसांच्या गोळीने तब्बल २६ नक्षलवाद्यांचा वेध घेतल्याची माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली. घटनास्थळावरून पोलिसांनी नक्षल्यांकडील शस्त्रसाठाही जप्त केला.
नक्षल नेतेही मारले गेले?सायंकाळपर्यंत चाललेल्या शोधमोहिमेत २६ नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले. या चकमकीत काही नक्षल नेतेही मारले गेल्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेषत: अनेक दिवसांपासून पोलिसांना चकमा देत असलेला नक्षल नेता मिलिंद तेलतुंबडे याचाही मृतांमध्ये समावेश असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. गृहमंत्र्यांकडून पोलिसांचे कौतुकपोलिसांनी राबविलेल्या या नक्षलविरोधी अभियानाचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे, अशा शब्दात कौतुक केले. ही राज्याच्याच नाही तर देशाच्या इतिहासातील उल्लेखनीय कामगिरी ठरली असल्याचे गौरवोद्गार त्यांनी व्यक्त केले.(बॉक्स)
चार वर्षांतील मोठ्या चकमकी- २२ एप्रिल २०१८ : भामरागड तालुक्यातील कसनासूरच्या जंगलात झालेल्या चकमकीत १६ नक्षलवादी ठार झाले.- २४ एप्रिल २०१८ : कसनासूर चकमकीमध्ये पळून जाणाऱ्या १५ नक्षलवाद्यांचे मृतदेह इंद्रावती नदीपात्रात मिळाले.- २५ एप्रिल २०१८ : भामरागड तालुक्यातील नैनेरच्या जंगलात झालेल्या चकमकीत ६ नक्षलवादी ठार झाले तर आधीच्या चकमकीतील दोन मृतदेह मिळाले.- १९ ऑक्टोबर २०२० : धानोरा तालुक्यातील किसनेली जंगल परिसरात उडालेल्या चकमकीत ५ नक्षलवादी ठार झाले.- २१ मे २०२१ : एटापल्ली तालुक्यातील कोटमीच्या जंगलात झालेल्या चकमकीत १३ नक्षलवादी ठार झाले.