मुंबई - राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते गेली 35 वर्षे एकनाथ खडसेंना भेटत आली आहेत. मात्र, खडसे त्यांच्या आग्रहाला कधीच बळी पडले नाहीत, असे म्हणत एकनाथ खडसे हे पक्षासोबत एकनिष्ठ असल्याचं केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.
विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ यांनी भाजपकडून फुलंब्री मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे त्यांच्यासोबत उपस्थित होते. भाजपमध्ये तिकीट वाटपावरून नाराज असलेल्या एकनाथ खडसे यांची राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी घेतलेल्या भेटीबद्दल विचारले असता दानवे म्हणाले की, मागील 35 वर्षात राष्ट्रवादीचे अजित पवार आणि काँग्रेसची मंडळी अनेक वेळा विविध कारणांनी त्यांना भेटत असतात. त्यांना वेगवेगळा आग्रह करत असतात मात्र ते कोणाच्या आग्रहाला बळी पडले नाहीत. खडसे भाजपचे जेष्ठ नेते आहेत, आज जरी पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नसली तरी पक्ष त्यांना उमेदवारी देऊ शकतो. किंवा भविष्यात त्यांच्याबद्दल मोठा विचार केला जाऊ शकतो, असा विश्वासही दानवे यांनी बोलून दाखवला. दानवेंच्या वक्तव्यामुळे खडसेंना मोठी जबाबादारी म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न निर्माण होत असतानाच खडसेंना राज्यपाल पद देण्याचा भाजपाकडून विचार सुरू असल्याची सुत्रांची माहिती आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात आज उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना ठाण्यात शरद पवार आणि मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचा नेता कन्हैय्या कुमार हेही उपस्थित होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी खडसेंबाबत डोळ्या उंचावणारे वक्तव्य केलं आहे. अजित पवार हे एबी फॉर्म घेऊन खडसेंच्या गावी म्हणजे जळगावकडे गेल्याची चर्चा सुरू होती. याबाबत, मला माहिती नसल्याचे पवार यांनी म्हटले. पण, खडसे गेल्या 3 महिन्यांपासून माझ्या संपर्कात असल्याचेही पवार यांनी सांगितले. त्यावर, मी गेल्या तीन महिन्यांपासूनच काय पण 3 वर्षांपासून पवारांच्या संपर्कात नसल्याचे खडसेंनी स्पष्टीकरण दिलंय.