पुणे : अवयव प्रत्यारोपणासाठी शहरात रविवारी दोनदा ‘ग्रीन कॉरिडॉर’ करण्यात आला़ नाशिकमधील वोकहार्ड हॉस्पिटलमधून हृदय आणि यकृत हे अवयव विमानाने आणि रस्त्यामार्गे आणण्यात आले. सकाळी हे अवयव पोहोचताच हृदय १३ वर्षांच्या मुलीवर रुबी हॉल रुग्णालयात प्रत्यारोपित करण्यात आले. यकृतही केईएम रुग्णालयातील एका रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात आल्याने दोघांना जीवदान मिळाले.संगमनेर येथील २९ वर्षीय तरुणाचा ३ दिवसांपूर्वी अपघात झाला. त्याला नाशिकमधील वोकहार्ड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला शनिवारी डॉक्टरांनी ब्रेनडेड जाहीर केले. त्याच्या आप्तांनी अवयवदानाची तयारी दाखविल्याने त्याचे हृदय रविवारी सकाळी शस्त्रक्रिया करून काढण्यात आले. नाशिक येथून खासगी विमानाने ते सकाळी सव्वानऊ वाजता हलविण्यात आले. लोहगाव विमानतळावर ते सव्वादहाच्या सुमारास पोहोचल्यावर लोहगाव ते रुबी हॉल रुग्णालयादरम्यान ग्रीन कॉरिडॉर करण्यात आला. केवळ ८ मिनिटांमध्ये ८ किलोमीटर अंतर पार करण्यात आले. चाकण रस्त्यावरील मोशी टोलनाका ते केईएम हॉस्पिटल दरम्यान ग्रीन कॉरिडॉर करण्यात आले. २४ किलोमीटरचे अंतर केवळ २० मिनिटांमध्ये पार पडले. सकाळी साडेनऊ वाजता सुरू झालेला यकृत प्रवास अडीच तासांनी दुपारी १२ वाजता संपला. (प्रतिनिधी)>संगमनेरमधील याच तरुणामुळे पुण्यातील दोन जणांना जीवदान मिळाले आहे. त्याचे मूत्रपिंडही वोकहार्डमधील एका रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात आले. त्याचे यकृत वोकहार्ड रुग्णालयातून रास्ता पेठेतील केईएमपर्यंत आणण्यात आले. नाशिकहून अॅम्ब्युलन्समधून यकृत आणले गेले. यकृतही केईएम रुग्णालयातील एका रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात आले, अशी माहिती अवयव प्रत्यारोपण समितीच्या (झेडटीसीसी) समन्वयक आरती गोखले यांनी दिली.
‘ग्रीन कॉरिडॉर’मुळे दोघांना मिळाले जीवदान
By admin | Published: April 03, 2017 1:03 AM