मुंबई : रेल्वे बजेट यंदा सर्वसाधारण अर्थसंकल्पात विलीन झाला असला तरी त्यात महाराष्ट्राचा फायदाच झाला आहे. यंदा महाराष्ट्रातील अनेक प्रकल्पांना हिरवा झेंडा दाखवण्यात आला असून, त्यासाठी जवळपास ५ हजार ९५८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राज्यातील १३ नवीन मार्गांचे सर्वेक्षण, सहा नवीन प्रकल्पांना मंजुरी आणि चार मार्गांवर विद्युतीकरण यांचा उल्लेख अर्थसंकल्पात आहे. मुंबईतील दोन एलिव्हेटेड रेलमार्ग आणि एका नवीन कॉरिडोरचाही त्यात समावेश आहे. राज्यातील रेल्वेचे विद्युतीकरण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. मध्य रेल्वेकडून राज्यातील मार्गांवर विद्युतीकरण केले जात आहे. राज्यातील ८६५ कोटी ४0 लाख रुपयांच्या चार महत्त्वाच्या विद्युतीकरणाच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये दौंड-बारामती, वणी-पिंपळकुट्टी, मिरज-कुर्डुवाडी-लातूर आणि गदग-होटगी यांचा समावेश आहे. यामुळे विजेची बचत होतानाच रेल्वेचा वेग वाढण्यासही मदत मिळेल, अशी आशा आहे. राज्यात रेल्वेचे जाळे विस्तारण्यासाठी रेल्वेकडून १३ नवीन मार्गांचे सर्वेक्षणही होईल. यामध्ये सावंतवाडी-रेडी फोर्ट, रामटेक-परशीवणी-खापा, वर्धा-बल्लारशहा चौथा मार्ग, भुसावळ-खांडवा तिसरा व चौथा मार्ग, बिदर-नांदेड, बिलासपूर-नागपूर चौथा मार्ग यांचा समावेश आहे. सहा नवीन प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली असून, त्यात पुणे ते लोणावळा तिसरा व चौथा मार्ग, फलटण ते पंढरपूर, जेऊर ते आष्टी आणि हातकणंगले ते इचलकरंजी मार्ग आहेत. (प्रतिनिधी)शकुंतला रेल्वे मूर्तिझापूर-यवतमाळ (११३ किमी), मूर्तिझापूर-अचलपूर (७७ किमी), पुलगाव-आर्वी (३५ किमी) या महाराष्ट्रातील सर्वात जुन्या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला आहे. हा मार्ग नॅरो गेज आहे आणि तो फार पूर्वी एका खासगी आॅपरेटरकडे होता. त्या मार्गाला शकुंतला हे नाव होत. नंतर शासनाने ताब्यात घेतला आणि आता त्याचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी २ हजार १00 कोटी रुपये खर्च येईल. - राज्यात ३0 रोड ओव्हरब्रिज आणि २३ सबवेही बांधले जाणार आहेत. यासाठी रेल्वेचा वाटा हा ३३१.९१ कोटी रुपये तर राज्याचा वाटा ३५९.४७ कोटी असेल.
रेल्वे प्रकल्पांना हिरवा झेंडा!
By admin | Published: February 04, 2017 4:51 AM