लोकमान्य टिळकांनी घरगुती गणेशोत्सव सार्वजनिक केला, त्याचीही शताब्दी झाली. त्या काळात उत्सवाचे स्वरूप बदलत गेले. पण, गेल्या दोन दशकांत त्यात अनेक बदल झाले. वाढत्या नागरीकरणामुळे सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप बदलले. मनोरंजनाच्या वाढत्या प्रभावाच्या रेट्यात उत्सवातील रंजन-प्रबोधनाला नवा पर्याय मिळाला, आयाम मिळाला. त्यातच, माहिती-तंत्रज्ञानातील क्रांतीच्या देखाव्यांतील तंत्रसज्जतेवर परिणाम झाला. देखावे तयार करण्यातील मेहनत तशीच राहिली, पण त्यातील सुबकतेला तंत्राची जोड मिळाली. त्याच वेळी त्यातील चळवळीच्या प्रभावापेक्षा आश्रयदात्या राजकीय नेत्यांचा प्रभाव वाढत गेला. त्यातील अनेक गोष्टींवर दरवर्षी चर्चा होत गेली, पण सर्वाधिक चर्चा झडली ती पर्यावरणपूरकतेवर, त्यासाठीच्या प्रयोगांवर. नवनव्या कल्पना राबवण्यावर.कागदाच्या लगद्यापासून मूर्ती, शाडूची मूर्ती, दरवर्षी नवी पार्थिव मूर्ती न आणता पंचधातूच्या मूर्तीचा वापर, असे अनेकानेक ट्रेण्ड गेल्या दीड दशकात भक्तांमध्ये रुजत गेले. म्हणजे, घरगुती-सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे प्रमाण वाढले, पण त्याच वेळी मूर्तींतील पर्यावरणपूरकताही वाढत गेली. प्लास्टिकचा कमी झालेला वापर, थर्माकोलवर आलेली बंधने, रंगांच्या वापरातील जागरूकता, आवाजाबद्दल वाढलेल्या जाणिवा यातून ग्रीन गणेशा असा नवा शब्द रूढ झाला. उत्सवाच्या कॉर्पोरेटीकरणात तो फिट्ट बसला. उत्तरपूजा केल्यानंतर मूर्तीचे विसर्जन न करता मूर्तिदान करणे, धातूच्या त्याच मूर्तीचा फेरवापर, फायबरच्या मूर्तीची उचलून धरलेली संकल्पना, विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा किंवा घरातील पिंपांचा वापर करणे... अशा अनेक संकल्पना सुरुवातीला जेव्हा मांडल्या गेल्या, तेव्हा त्या सहज स्वीकारल्या गेल्या नाहीत. उलट, श्रद्धेचा विचार करता त्यांना प्रारंभी विरोध झाला. मात्र, कालांतराने एकेका टप्प्यावर जागृती वाढताच त्यांचा सहज स्वीकार झाला. त्या कल्पना रुजल्या. अगदी ‘एक गाव-एक गणपती’प्रमाणेच ‘एक सोसायटी-एक गणपती’ची संकल्पनाही स्वीकारली गेली. वेगवेगळ्या महापालिका, नगरपालिका, स्वयंसेवी संस्थांनी उत्सवाच्या पर्यावरणपूरकतेला हातभार लागावा म्हणून अनेक उपक्रम राबवले. एनजीओंनी जरी त्यांच्या योजनांचे मार्के र्टिंग केले असले, तरी पर्यावरणाचा मुद्दा अर्धवट स्वीकारल्याचे दुष्परिणाम आता दिसू लागले आहेत. त्यामुळे पर्यावरण जपण्याचा उद्देश खरेच सफल होतो आहे का, याबाबत शंका निर्माण होण्याजोगी स्थिती आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या परिसरांत फेरफटका मारल्यावर तेच दिसून येते. पालिकांतील पर्यावरणाचा विचार, कृती अर्धवट असल्याचे दुष्परिणाम पाहायला मिळत आहेत. निर्माल्य गोळा केले जाते, पण त्याचे खत करण्याची प्रक्रियाच पुरेशी नसल्याने त्यातील बहुतांश कचऱ्यात जाते. मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात झाले, तरी नंतर त्या तलावातील मूर्तींचे पुढे काय करावे, याबाबत जागृती नसल्याने तलावातील ते पाणी तसेच पुन्हा नदी, खाडी किंवा समुद्रात टाकले जाते किंवा मूर्तींचे फेरविसर्जन केले जाते. आवाजाचे प्रदूषण मोजण्याची यंत्रणाही प्रभावी नाही. त्यामुळे पर्यावरणाचा जप करत हवी ती व्यवस्था करून देणे, पर्यावरणाच्या नावाने तेवढ्यापुरते गळे काढणे एवढेच कार्य केले जाते. नंतर, धरसोड वृत्तीमुळे पर्यावरणाचा शिमगा कसा केला जातो, त्याचे प्रत्यंतर येते आहे. जागृती झाली आहे, पण गरज आहे अखेरपर्यंत विषय मार्गी लावण्याची. त्याचीच कमतरता सध्या जाणवते आहे. त्यावर नीट भर दिला, तर पर्यावरणाभिमुख उत्सवाचे स्वरूप अधिक नेमके, नेटके, देखणे होईल. त्यासाठीच्याच जागृतीची सध्या गरज आहे. >थर्माकोलचा वापर कमीगणेशोत्सवाच्या मखरातील थर्माकोलचा वाढता वापर कमी व्हावा, यासाठी सुरुवातीला प्रयत्न झाले. त्यातूनच पुढे पुठ्ठा, कागदांचा वापर वाढला. फुलांनी सुशोभित केलेली मखरे आली. काही ठिकाणी त्याचा विपरीत परिणाम झाला आणि प्लास्टिकचा वापर वाढला. प्लास्टिकची फुले, पाने, रेडिमेड मखरे, फायबरचे देव्हारे यांचा वापर वाढत गेला. रोषणाईचे साहित्यही सर्वाधिक प्लास्टिकचेच असते. >रंगांचा वापर : मूर्तींच्या रंगकामासाठी वापरले जाणारे रासायनिक रंग टाळण्याची अणखी एक मोहीम राबवली गेली. मात्र, पेण-हमरापूरहून कच्ची मूर्ती आणून त्यावर रंगकाम करताना मूर्तीचे शरीर, मुकुट, दागिने, वस्त्रे यांना स्प्रे पेंटिंग पद्धतीने रंग दिला जातो. त्यात नैसर्गिक रंगांपेक्षा रासायनिक रंगांचा वापर अधिक होतो. अशा रंगांच्या वापरामुळे आणि स्प्रे पद्धतीने दिलेल्या रंगांतून येणाऱ्या शेडमुळे मूर्ती अधिक उठावदार होते, तिच्यात जिवंतपणा येतो. भाव अधिक गहिरे होतात. त्यामुळे त्यांचा वापर कमी झालेला नाही.
ग्रीन गणेशा
By admin | Published: September 18, 2016 2:51 AM