यवतमाळ : वन्यजीवांचे संरक्षण, वनगुन्ह्यांचा तपास आदी कार्याचा गौरव म्हणून वनविभागातील अधिकारी, कर्मचारी आणि संस्था प्रतिनिधींना व्याघ्रदूत अमिताभ बच्चन यांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे. येत्या मंगळवारी बोरीवली (मुंबई) येथे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात हा कार्यक्रम घेतला जाणार आहे. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वनविभागाने पुरस्कार जाहीर केले आहेत. शहापूर इको विकास समिती व राखीव व्याघ्र प्रकल्प अमरावतीचे अध्यक्ष व्यंकट मुडे व सचिव प्रतिभा तुरक आणि बफर डिव्हिजन चंद्रपूरचे अध्यक्ष रमेश गेडाम आणि सचिव डी.एम. कुळमेथे यांना पुरस्कृत केले जाणार आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत वनगुन्ह्यांचा तपास आणि योग्यरीत्या हाताळणीबद्दल नागपूर विभागाचे एसीएफ बी.आर. वीरसेन आणि श्वान पथकाची जबाबदारी सांभाळणारे वनरक्षक अतिफ हुसैन यांना सन्मानित करण्यात येणार आहे. ‘वन्यजीव व्यवस्थापन-२०१५’ या विषयात वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजित माने यांचा सन्मान केला जाणार आहे.‘आवास संरक्षण आणि जीर्णोद्धार’ या विषयात राज्यात उत्कृष्ट कामगिरी बजावणारे सिरोंचा विभागातील वनरक्षक पी.आर. लाडे आणि गडचिरोली येथील डी.व्ही. पोफळी यांना पुरस्कृत केले जाणार आहे. संरक्षित क्षेत्रात वन्यजीवांना राहण्याच्या जागेचा विकास घडवून आणल्याबद्दल अकोट येथील विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) उमेश वर्मा, संरक्षित क्षेत्राच्या संरक्षणासाठी पेंच राखीव व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक यांना पुरस्कृत केले जाणार आहे. वन्यजीवांच्या तस्करीसंबंधी गुन्ह्णाच्या तपासासाठी मेळघाट राखीव व्याघ्र प्रकल्पाचे ढाकणा वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी. धोटे आणि जळगावचे नरेगा व वाईल्ड लाईफचे विद्यमान एसीएफ तथा तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी डी.आर. पाटील यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे.
व्याघ्रदूतांच्या हस्ते होणार गौरव!
By admin | Published: October 05, 2015 3:25 AM