गौरी टेंबकर - कलगुटकर, मुंबईनिवडणूक प्रचाराची धामधूम सुरू असताना, बुधवारी सकाळी आलेला एक फोन पार्ल्यातील शिवाजीनगर परिसर शोककळा पसरविणारा ठरला. रत्नागिरीतील खानू येथे मोटार धडकून झालेल्या अपघातात या परिसरातील सात तरुण मृत्युमुखी पडले, तर एक जण गंभीर जखमी झाल्याच्या वृत्ताने संबंधितांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार अक्षरश: हादरून गेला. या अपघातात मृत्यू पावलेल्या प्रशांत गुरव (वय २८) याच्या बहिणीचा येत्या रविवारी साखरपुडा असल्याने त्याची तयारी सुरू होती. मात्र, अचानक घडलेल्या या घटनेने, आनंदाचे रूपांतर शोकामध्ये झाले. त्यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता.प्रशांत हा फिल्मसिटीमध्ये मेकअपमन होता. सचिन शिपिंग कंपनीत तर निहार कोटियन मेट्रो स्टेशन आॅपरेटर म्हणून कार्यरत होता. केदार तोडकर महाविद्यालयात शिकत होता, तर अन्य चौघेजण खासगी कंपनीत काम करीत होते. गोव्याला फिरायला जायचे ठरल्यानंतर, सकाळी साडेपाचला ते मालाडमधून झायलो गाडीने निघाले होते. प्रशांतचे कुटुंब मूळचे सावंतवाडीचे असून, येत्या रविवारी त्याची बहीण प्रणाली हिचा साखरपुडा होणार होता. त्यामुळे त्याने त्याची तयारी जोरात केली होती. साखरपुड्यासाठी छापलेल्या पत्रिका आसपासच्या परिसरामध्ये वाटण्यात आल्या होता. गोव्यात जाण्यापूर्वी सावंतवाडी येथे राहात असलेल्या चुलत बहिणींना पत्रिका देऊन पुढे जायचे, असे त्यांचे ठरले होते. मात्र, त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला. वैभव मनवे हा घरातील एकटाच कर्ता पुरुष होता. हलाखीच्या परिस्थितीमुळे त्याच्या आईने त्याला धुणीभांडी करून मोठे केले. काही महिन्यांपूर्वी त्याच्या वडिलांचा अपघात झाला होता. त्यानंतर, आज वैभवच्या मृत्यूच्या बातमीने त्यांना मोठा धक्का बसला. केदार तोडकरचे कुटुंबीय या धक्क्यातून सावरलेले नाहीत. त्याच्यामागे आईवडील, दोन बहिणी असा त्याचा परिवार आहे. पार्ल्यात केदारच्या वडिलांचे एक छोटे दुकान आहे. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. केदारच्या निधनामुळे त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी त्याचे कुटुंब व मित्र रत्नागिरीला गेले असल्याचे, या परिसरातील लक्ष फाउंडेशनचे सुमीत तळवलकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
साखरपुड्याच्या आनंदावर अपघातामुळे शोककळा
By admin | Published: February 09, 2017 2:44 AM