मुंबई : मुंबई पोलीस दलात सुरू असलेल्या कॉन्स्टेबलच्या पदासाठी आत्तापर्यंत ३० हजारांवर उमेदवारांच्या मैदानी परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. अद्याप २ मेपर्यंत शारीरिक चाचण्या होणार आहेत. त्यानंतर मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.मुंबई पोलीस दलातील १२७५ पदांसाठी शहर व उपनगरातील चार पोलीस प्रशिक्षण केंद्रांवर ११ एप्रिलपासून मैदानी परीक्षा सुरू आहे. दररोज सरासरी नऊ हजार उमेदवारांच्या परीक्षांचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात सहा ते साडेसहा हजार उमेदवार सहभागी होत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दुष्काळग्रस्त भागातील इच्छुकांचे गैरहजेरीचे प्रमाण मोठे असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.राज्य पोलीस दलातील विविध ६१ घटकांमध्ये शिपायाची ४ हजार ८३३ पदाची ‘मेगा भरती’ सुरू आहे. त्यापैकी सर्वाधिक १,२७५ पदे मुंबईत असल्याने या ठिकाणी भरती होण्यासाठी तब्बल १ लाख ५२ हजार ७९ जणांनी आॅनलाइन अर्ज केले होते. त्यामध्ये तरुणींची संख्या ३३ हजार ६२३ इतकी होती. छाननीतून १ लाख ४४ हजार ७८० अर्ज पात्र ठरले होते. मात्र प्रत्यक्ष कागदपत्राच्या छाननीत ६० हजार उमेदवारांनी हजेरी लावली. पोलीस भरती मंडळाचे अध्यक्ष व सहआयुक्त (प्रशासन) अनुपकुमार सिंग यांच्या नेतृत्वाखाली या उमेदवारांच्या मैदानी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मरोळ, विक्रोळी, वरळी व नायगाव येथील पोलीस मैदानावर भरती सुरू आहे. बुधवारपर्यंत जवळपास ६० हजार उमेदवारांची शारीरिक चाचणी पूर्ण झाली असल्याचे सिंग यांनी सांगितले. मैदानी परीक्षा २ मेपर्यंत चालणार आहेत. त्यानंतर विविध प्रवर्गानुसार ‘कट आॅफ लिस्ट’ साधारण १५ मेच्या दरम्यान जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांची मे महिन्याअखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात लेखी परीक्षा मरोळ येथील केंद्रावर घेणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.(प्रतिनिधी)
आठ दिवसांत ३० हजार उमेदवारांची मैदानी चाचणी
By admin | Published: April 22, 2016 3:37 AM