औरंगाबाद : हुंडा प्रथा बंद होण्यासाठी आणि पाण्याच्या बचतीसाठी गावागावांत सामूहिक विवाह सोहळे झाले पाहिजेत, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी शनिवारी शिवसेनेतर्फे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्याप्रसंगी केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजनेंतर्गत अयोध्यानगरीच्या मैदानावर औरंगाबाद जिल्ह्यातील हिंदू, मुस्लिम आणि बौद्ध धर्मीय २४५ जोडप्यांचा भव्य विवाह सोहळा हजारोंच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल सी. विद्यासागर राव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, पालकमंत्री रामदास कदम, परिवहनमंत्री दिवाकर रावते, खा. चंद्रकांत खैरे, खा. राजकुमार धूत उपस्थित होते. यावेळी राज्यपाल म्हणाले की, सामूहिक विवाह हा चांगलाउपक्रम आहे. यामुळे पैशाची बचत होते. मराठवाड्यात पाणी स्थिती गंभीर असल्यामुळे अशा विवाह सोहळ्यामुळे पाण्याचीही बचत होणार आहे. विविध जातीसमूहातील विवाह सोहळे आयोजित झाल्यास समाजात एकोपानिर्माण होईल. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात सर्व गावागावांत असे उपक्रम व्हावेत. मराठवाड्यासह राज्यात कठीण परिस्थिती आहे. दुष्काळामध्ये नद्या, विहिरी, तलाव आटले आहेत. मात्र, शिवसेनेतील माणुसकीचा झरा कधीही आटणार नाही. आम्ही माणसं जोडतो. अडीअडचणीमध्ये असलेल्या कोणत्याही समाज किंवा धर्माच्या व्यक्तीला मदत करणे हेच आमचे हिंदुत्व असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक या विवाह सोहळ्याचे संयोजक असलेले खा. चंद्रकांत खैरे यांनी केले. यापुढे जालना, बीड आणि उस्मानाबाद येथेही अशा स्वरुपाचे विवाह सोहळे होतील, असे ते म्हणाले. यावेळी ८ मुस्लिम, ४२ बौद्ध आणि १९५ हिंदू जोडप्यांचा विवाह थाटात पार पडला. यासाठी भव्य असे स्टेज आणि मंडप उभारण्यात आले होते. प्रत्येक धर्माच्या रितीरिवाजानुसार ही लग्ने लावण्यात आली. (प्रतिनिधी)धूत यांच्यातर्फे २० टँकरखा. राजकुमार धूत यांच्यातर्फे दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी शिवसेनेतर्फे पाण्याचे २० टँकर देण्यात आले. या टँकरचे लोकार्पण राज्यपालांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या मराठवाड्यातील जिल्हाप्रमुख तसेच इतर कार्यकर्त्यांकडे टँकरच्या चाव्या देऊन करण्यात आले. अयोध्यानगरीच्या मैदानावरच हे सर्व टँकर उभे करण्यात आले होते.
सामूहिक विवाह सोहळे गावागावांत व्हावेत
By admin | Published: April 17, 2016 1:45 AM