- संजय देशमुख (जालना)
पितृ पंधरवडा संपून आता नवरात्रौत्सवारस परंपरागत पद्धतीने उत्साहाने सुरुवात झाली आहे. सोयाबीनची काढणी पूर्ण झाली असून, अडत व्यापाऱ्यांना आता सोयाबीन बाजारात केव्हा दाखल होते, याची प्रतीक्षा लागली आहे. नवरात्रौत्सवात अनेक शेतकरी दसरा, दिवाळीनिमित्त सोयाबीन बाजारात आणतात. सध्या जालना बाजारपेठेत सोयाबीनची आवक वाढली असून, ती जवळपास ५ हजार पोती एवढी आहे. नवरात्रामुळे उपवासाच्या पदार्थांची मागणी लक्षात घेता, घाऊक बाजारपेठेत शेंगदाणे ६ ते ८ हजार क्विंटलवर पोहोचले असून, त्यात आणखी ५०० ते ७०० रुपयांची वाढ अपेक्षित आहे.
महिन्या, दोन महिन्यांपासून जालना बाजारपेठेत सर्वकाही शांत शांत सुरू आहे. पावसाने हुलकावणी दिल्याचा परिणामही बाजारपेठेवर दिसून येत आहे. रबी हंगामात प्रामुख्याने शाळू, ज्वारी आणि हरभरा, तसेच गव्हाची पेरणी केली जाते. मात्र, घटस्थापना झाल्यावरही अद्याप या पेरणीला प्रारंभ झालेला नाही. त्यामुळे रबी हंगामातील पेरण्या लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. पावसाने आता पूर्णपणे परतीचा मार्ग स्वीकारल्याने नवरात्रात एखाददुसरा मोठा पाऊस पडण्याची अपेक्षा शेतकरी वर्गात आहे. एकूणच खरीप आणि रबी, असे दोन्ही हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
जालना जिल्ह्यातील गोदावरी नदीपात्राजवळ असलेल्या घनसावंगी आणि अंबड तालुक्यांत यंदा उसाचे विक्रमी उत्पादन निघण्याची शक्यता आहे. याच भागात समर्थ, सागर व समृद्धी, हे तीन साखर कारखाने असल्याने याचा गळीत हंगाम दसऱ्यालाच प्रारंभ होणार आहे. आतापासून ऊसतोडणीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील रामेश्वर, बागेश्वरी सहकारी साखर कारखान्यांनीही गळीत हंगामाची तयारी सुरू केली आहे.
नवरात्रौत्सवामुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण असले तरीही मोंढ्यासह अन्य बाजारपेठांत मात्र अद्याप खरेदीसाठी नागरिक बाहेर पडले नाहीत. उपवासाच्या साहित्याची दुकाने मात्र जागोजागी थाटली आहेत. दसऱ्यानिमित्त तयार कपड्यांची बाजापेठ सज्ज झाली असून, व्यापारी ग्राहकांच्या प्रतीक्षेत आहेत. नारळाचीही मागणी वाढणार आहे. मुंबई व परिसरातून जालन्यात मोठ्या प्रमाणात नारळाची आवक वाढली आहे.
शंभर भरतीचे चांगल्या दर्जाचे नारळ १ हजार ५३० रुपयांत एक पोते विक्री होत आहे. बाजारपेठेत गहू तीनशे पोती (भाव प्रति क्विं. १,९०० ते २,४०० रु.), ज्वारी पाचशे पोती (१,७०० ते २,५००), बाजरी तीनशे पोती (१,३०० ते २,०००), मूग पाचशे पोती (४,२०० ते ५,२००), उडीद पाचशे पोती (३,८०० ते ४,१५०), सोयाबीन ४,००० पोती (२,९०० ते ३,१००), मका, बाराशे पोती (१,१५० ते १,४००), साखरेचे प्रतिक्विंटल भाव ३,२५० ते ३,३५० रुपये असे आहे. साबुदाण्याचा दर प्रतिक्विंटल ४,६०० ते ५,००० एवढा असल्याचे बाजारातील सूत्रांनी सांगितले. दरम्यान, येणारे सण, उत्सवाच्या काळात महागाई वाढण्याची शक्यता असल्याने गृहिणी चिंताग्रस्त झाल्या आहेत.