पुणे : राज्यातील ऊस तोडणी कामगारांना २० टक्के अंतरिम वाढ देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र, या घोषणेला एक वर्ष उटल्यानंतरही त्याची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे ऊस तोडणी कामगारांचे राज्यव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी संघटनेचे अध्यक्ष बबनराव ढाकणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.ढाकणे म्हणाले, राज्यात तब्ब्बल १२ ते १५ लाख उसतोडणी कामगार आहेत. शासनाने मजुरी वाढीचा करार २००५मध्ये केला होता. त्यानंतर कोणताही करार झालेला नाही. त्यामुळे मागील वर्षी संघटनेने बेमुदत संप पुकारला होता. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपामुळे राज्याचे नुकसान होत असून, कोणत्याही कामगारावर अन्याय होणार नाही अशी ग्वाही देत, २० टक्के अंतरिम दरवाढ देत असल्याची घोषणा केली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी या कामगारांचा विश्वासघात केला आहे, असा आरोप त्यांनी केला.गेल्या दोन महिन्यांपासून कामगारांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. मात्र, शासन तसेच खासगी कारखानदारांकडून साखर संघाच्या कराराचे कारण देत हा संप मोडून काढण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. संघटनेच्या मागण्यांबाबत येत्या तीन दिवसात शासनाने निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देतानाच ऐन दिवाळीत शासनाने या कामगारांना उपाशी ठेऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
ऊस कामगारांचा संप तीव्र करणार - ढाकणे
By admin | Published: November 04, 2015 2:32 AM