राष्ट्रवादीविरोधात सेनेत खदखद; अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर मुख्यमंत्र्यांकडे तीव्र संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 07:19 AM2022-02-13T07:19:17+5:302022-02-13T07:24:24+5:30

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निधी मागणीसाठी कोणतीही फाईल गेली तर तिच्यावर ते नकारात्मक शेरा मारतात. त्यांना विचारायला गेल्यास टाळाटाळ करतात.

Grumble In the shiv sena against NCP; Anger about Ajit Pawar's working style in the shiv sena | राष्ट्रवादीविरोधात सेनेत खदखद; अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर मुख्यमंत्र्यांकडे तीव्र संताप

राष्ट्रवादीविरोधात सेनेत खदखद; अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर मुख्यमंत्र्यांकडे तीव्र संताप

googlenewsNext


अतुल कुलकर्णी -

मुंबई : निधीवाटपात अन्याय झाल्याची भावना काँग्रेस पक्षाने वारंवार बोलून दाखवली असताना आता दस्तुरखुद्द शिवसेनेच्या मंत्री आणि नेत्यांनीही अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तीव्र संताप व्यक्त करत अनेक तक्रारी केल्या. अजित पवारशिवसेना आमदारांच्या मतदारसंघात पराभूत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निधी देत असल्याची तक्रारही मुख्यमंत्र्यांकडे मांडली. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडीचे चित्र बघायला मिळत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निधी मागणीसाठी कोणतीही फाईल गेली तर तिच्यावर ते नकारात्मक शेरा मारतात. त्यांना विचारायला गेल्यास टाळाटाळ करतात. योग्य उत्तरे देत नाहीत, अशी भावना मंत्र्यांनी व्यक्त केली. अनेकदा शिवसेनेच्या आमदारांना मिळणारी वागणूकदेखील चांगली नसते. निधी देताना उपकाराची भावना असते. हा सर्व प्रकार आपण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सांगावा, असेही मंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले.

शुक्रवारी रात्री शिवसेनेच्या काही निवडक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आणि राष्ट्रवादी विरोधातील तक्रारींचा पाढा वाचला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री दादा भुसे, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह अनेक ज्येष्ठ मंत्री यावेळी उपस्थित होते. अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षवाढीच्या नावाखाली शिवसेनेचे खच्चीकरण करत असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. 

प्रामुख्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात शिवसेना नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्या. शिवसेना आमदार असलेल्या मतदारसंघात २०१९ मध्ये जेथे राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले तिथे अजित पवारांकडून विद्यमान आमदारांना डावलून राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांना निधी दिला जात आहे. त्यामुळे शिवसेना आमदारांनी कोणाकडे हा विषय मांडायचा, असा थेट सवालही ठाकरे यांना केला. शिवाय राष्ट्रवादीच्या आमदारांना अधिक निधी दिला जातो. त्यामुळे शिवसेनेचे आमदार सत्ता असूनही मागे पडत आहेत, अशीही नाराजी नेत्यांनी व्यक्त केली. अनेक ठिकाणी शिवसेनेच्या डोक्यावर बसण्याचे काम राष्ट्रवादी करते आहे. त्यामुळे पक्षविस्ताराच्या नावाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवत आहे, असा गंभीर आक्षेपही नेत्यांनी घेतला. 

नियोजनाच्या नावाखाली निधीला कात्री 
अर्थ खात्याचा शिवसेनेच्या विविध मंत्र्यांच्या विभागात अनावश्यक हस्तक्षेप वाढलेला आहे. आर्थिक नियोजनाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर निधीला कात्री लावत असल्याची भावना मंत्र्यांनी बोलून दाखवली. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून शिवसेना आमदार आणि मंत्री यांची नाराजी दूर करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

- अजित पवार यांच्याविरोधात तक्रारींचा पाढा वाचताना शिवसेनेच्या मंत्र्यांच्या निधीला कात्री लावली जात आहे. राष्ट्रवादीचे पालकमंत्री शिवसैनिकांची कामे करत नाहीत.
- राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना निधीची खैरात झाली असून, तब्बल ४९ टक्के निधी राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या विभागांना देण्यात आल्याची तक्रार सेना नेत्यांनी केली आहे. शिवसेनेच्या वाट्याला अवघा १९ टक्के निधी आल्याचेही मंत्र्यांनी सांगितले.
 

 

Web Title: Grumble In the shiv sena against NCP; Anger about Ajit Pawar's working style in the shiv sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.