ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - वस्तू आणि सेवा कर अर्धात जीएसटी विधेयक आज महाराष्ट्र विधानसभेत एकमताने मंजुर करण्यात आले. जीएसटी विधेयकावर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनात आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी या विधेयकाला एकमताने मंजुरी देण्यात आली.
विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी जीएसटी विधेयकाला विधानसभेने एकमताने मंजुरी दिल्याचे जाहीर केले. त्याबरोबरच जीएसटी संदर्भातील तीन विधेयकेही एकमताने मंजूर करण्यात आली. दरम्यान जीएसटीला एकमताने मंजुरी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान काल सुमारे पाच तासाच्या चर्चेनंतर विधान परिषदेत वस्तू व सेवाकरासंदर्भातील विधेयक एकमताने मंजूर झाले होते. राज्यात जीएसटी लागू झाल्यानंतर पाच वर्षात पाच लाख कोटी रुपयांचा महसूल जमा होऊन राज्याची आर्थिक स्थिती भक्कम राहणार आहे. त्यामुळे राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांना अनुदान देण्यास सक्षम असेल, अशी माहिती अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तर जीएसटीच्या दरामध्ये समानता असावी, अशी सूचना सदस्यांनी त्यावेळी केली.
केंद्र सरकारने जीएसटी आणि त्यासंबंधीची अन्य विधेयके संसदेत मंजूर करून घेतली आहेत. 1 जुलै 2017 पासून देशात जीएसटी लागू करण्यात येणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते.