ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - जीएसटी कररचना लागू झाल्यामुळे सामान्य माणसाला फायदा होईल. त्याला अच्छेदिन येतील असे सरकारकडून सांगण्यात येत असले तरी, प्रत्यक्षात दिवसाची सुरुवात कटिंग चहाने करणा-यांना मात्र जीएसटीचा खराब अनुभव येणार आहे. नाक्यावर हॉटेलच्या बाहेर उभे राहून वाफाळता कटिंग चहा ओठांना लावून दिवसाची सुरुवात करणा-यांना यापुढे जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
जीएसटीमुळे हॉटेलमध्ये मिळणा-या कटिंग चहाची किंमत 1 रुपयांनी वाढली आहे. अनधिकृत चहाच्या टप-यांवर मिळणा-या कटिंगच्या किंमतीत वाढ झाली नसली तरी, हॉटेलमधला कटिंग चहा मात्र महागला आहे. जीएसटी परिषदेने हॉटेलमधले खानपान जीएसटीच्या कक्षेत आणले असून, आजपासून एसी रेस्टॉरंटमधले खान-पान महागणार आहे.
आणखी वाचा
एसी रेस्टॉरंटमध्ये 18 टक्के कर भरावा लागेल तेच नॉन एसी रेस्टॉरंटमध्ये 12 टक्के कर द्यावा लागेल. त्यामुळे चहाच नाही हॉटेलमधले पोहे, उपमा, डोसा हे खाद्य पदार्थही महागणार आहेत. याचा हॉटेलच्या बाहेर सायकल किंवा गाडयांवर खाद्यपदार्थ विकणा-यांना फायदा होऊ शकतो. त्याच्याकडे गर्दी वाढू शकते.
जीएसटी म्हणजे काय ?
जीएसटी अर्थातच वस्तू आणि सेवा कर हा संपूर्ण देशभरात लागू केला जाणार असून, यामुळे व्हॅटसह इतर सर्व कर रद्द होणार आहे. सध्या देशात केंद्र आणि राज्य सरकारांचे २० हून अधिक विविध कर करदात्याला भरावे लागतात. जीएसटी लागू झाल्यावर या सगळ्या करांची जागा फक्त एकच कर घेणार आहे तो म्हणजे ‘जीएसटी’. या करप्रणालीमुळे सेंट्रल सेल्स टॅक्स, सेवा कर, एक्साइज टॅक्स, लक्झरी टॅक्स, मनोरंजन कर, व्हॅटसारखे सर्व कर रद्द होणार आहेत. ही करप्रणाली लागू झाल्यानंतर केंद्र आणि राज्यसरकारला यातील समान वाटा मिळणार आहे. ‘वन नेशन वन टॅक्स’ या संकल्पनेवर जीएसटी आधारित आहे.
राज्य आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या करप्रणालींना पर्याय म्हणून जीएसटीकडे पाहिलं जात आहे. जीएसटी ही भारतातील सर्वात मोठी आर्थिक सुधारणा आहे. या करप्रणालीमुळे करचुकव्यांना चाप बसणार असून राज्य सरकार तसेच सर्वसामान्यांना यामुळे कोणताही त्रास होणार नाही.
जीएसटी लागू झाल्यावर फक्त तीन टॅक्स भरावे लागणार -
१. सेंट्रल जीएसटी-हा कर केंद्र सरकार वसूल करेल.
२.स्टेट जीएसटी -हा कर राज्य सरकारे त्यांच्या राज्यातील करदात्यांकडून वसूल करतील.
३.इंटिग्रेटेड (एकत्रित) जीएसटी -दोन राज्यातील व्यापारावर हा कर लागू होईल.