ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - देशात बहुचर्चित जीएसटी कर प्रणाली लागू झाली आहे. यापुर्वी काल राज्यासह देशात जीएसटीचे स्वागत आणि विविध करांना राम-राम करण्यासाठी शुक्रवारी मुंबईतील बहुतेक दुकानांसह शोरूममध्ये बंपर सेलचे आयोजन केले होते. विशेषत: इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठ्या प्रमाणात कराचा बोजा पडणार असल्याने दुकानदारांकडून जुना माल खपवण्यासाठी १० टक्क्यांपासून ५० टक्क्यांपर्यंत सेलची आॅफर देण्यात आली. त्यामुळे बहुतेक दुकानांत ग्राहकांनी खरेदीसाठी तुफान गर्दी केली होती.
‘आऊट आॅफ स्टॉक’सह ‘एका दिवसात डिलिव्हरी’, ‘भरघोस सूट’ अशा पाट्या दुकानांसह मोठमोठ्या शोरूमबाहेर शुक्रवारी रात्रीपर्यंत दिसल्या. फ्रिज, टी.व्ही., मोबाइल, कूलर या वस्तूंना अधिक मागणी होती. जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वीकारून नव्या वस्तूंवर भरमसाठ सूट देत असल्याने काही शोरूमबाहेर तर जुन्या वस्तूंचा पर्वत तयार झाला होता. त्यामुळे नामांकित शोरूमलाही भंगाराच्या दुकानाचे रूप आले होते.
जीएसटीचा विपरीत परिणाम झाल्याचेही शहरात निदर्शनास आले. भरघोस सूटमुळे ग्राहकांनी ठरावीक इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी केल्याने त्या वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला होता. तांदूळ, गहू, दूध, कडधान्ये, डाळी यांना याआधी शून्य टक्के कर होता आणि आतादेखील शून्य टक्के कर आहे. तसेच साखर, चहा, कॉफी आणि खाद्यतेल यावर पाच टक्के कर होता आणि जीएसटीनंतरदेखील पाच टक्के कर आहे. तांदूळ, गहू, दूध, कडधान्ये, डाळी, साखर, चहा, कॉफी आणि खाद्यतेल हे मूलभूत खाद्यपदार्थ जीएसटीमधून वगळण्यात आले आहेत. जीएसटी भवन उजळले-देशभरात शनिवारपासून वस्तू आणि सेवा कर लागू होत असतानाच चर्चगेट येथील सेंट्रल एक्साइज कार्यालयाचे ‘जीएसटी भवन’ असे नामकरण करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री जीएसटी भवनाच्या इमारतीवर नेत्रदीपक रोशणाई करण्यात आली होती. परिणामी, जीएसटी भवनाची इमारत उजळल्याचे चित्र होते.ऑ