ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.15- जीएसटी अर्थातच वस्तू आणि सेवा कर लागू व्हायला काहीच दिवस शिल्लक आहेत. 1 जुलैपासून संपूर्ण भारतात जीएसटी लागू होणार आहे. पण जीएसटी लागू होण्याच्या आधी ग्राहकांसाठी खुश खबर आहे. जीएसटी सुरू होण्याच्या आधी मोठ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, मोबाईल तसंच मोबाईल एक्सेसरीज, चपला या वस्तूंच्या खरेदीवर दुकानांमध्ये तसंच ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्सवर भरघोस सूट दिली जाते आहे. रिटेलरकडून सध्या देण्यात येत असलेल्या मालावर कमी मार्जिन आकारलं जातं आहे. 1 जुलैनंतर कराच्या दरात वाढ होइल तसंच जीएसटी लागू झाल्यानंतर दुकानात आधी उपलब्ध असलेल्या सामानासंदर्भात बरेच कागदोपत्री व्यवहार करावे लागणार आहेत. या गोष्टी टाळण्यासाठी दुकानांमध्ये तसंच ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर स्टॉक क्लिअरिंग सेल सुरू झाला आहे.
दुकानांमध्ये सुरू असलेल्या स्टॉक क्लिअरिंगमध्ये एअर कंडिशनवर दहा ते चाळीस टक्के सूट दिली जाते आहे. तर काही कपड्यांच्या कंपन्याकडून पन्नास टक्के डिस्काऊंटवर कपडे विकले जात आहेत.
या आठवड्यामध्ये ऑनलाइन मार्केटमधील पेटीएम मॉलने तीन दिवसांचा "प्री-जीएसटी" सेल सुरू केला आहे. 13 जून ते 15 जूनपर्यत हा सेल आहे. या सेलमध्ये सहा हजार रिलेटर्सचा समावेश असून 500 ब्रॅण्ड ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. इलेक्टॉनिक्स आणि कपड्यांसह दूचाकी गाड्यांच्या किंमतीवरसुद्धा सवलत दिली जाते आहे. बजाज ऑटो ही कंपनी दूचाकीच्या खरेदीवर साडे चार हजार रूपयांची सूट देते आहे. जीएसटी लागू होण्याआधी ग्राहकांना फायदा व्हावा, या हेतूने स्किम सुरू केल्याचं बजाज ऑटो कंपनीने "द इंडियन एक्सप्रेस" या वृत्तपत्राला सांगितलं आहे.
"प्री-जीएसटी सेलमध्ये टीव्ही, ग्राहकांच्या उपयोगाच्या वस्तू, लॅपटॉप, डीएसएलआर कॅमेरा खरेदी केल्यावर वीस हजार रूपयांपर्यंत कॅश बॅक दिला जाईल. तर ब्लूटूथ स्पिकर, चपला, दागिन्यांवर 50 टक्के सूट दिली असून ग्राहकांना 25 टक्के कॅश बॅकसुद्धा दिला जाणार आहे. नवीन कर प्रणाली लागू होण्याआधी दुकानामधील माल संपवावा, या विचाराने किरकोळ विक्रेत्यांनी या सेलसाठी पुढाकार घेतल्याची प्रतिक्रिया पेटीएम मॉलने द इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राला दिली आहे.
दिल्लीमधील एका इलेक्टॉनिक दुकांनात एसी खरेदीवर 10 ते 40 टक्क्यांपर्यत सूट दिली जाते आहे. या दुकानाच्या तीन शाखा सध्या दिल्लीत आहेत. पेपे जिन्सच्या अहमदाबादमधील एका दुकानात या आठवड्याच्या सुरूवातीला 40 टक्के सूट देण्यात येत होती पण आता 50 टक्के सूट कपड्यांच्या खरेदीवर दिली जाते आहे.
फ्लिपकार्ट, अमेझॉन या ऑनलाइन शॉपिंग बेवसाइट्सवर बाजारातील तयार कपडे विकले जातात, त्यांना जीएसटी लागू झाला तरी जास्त परिणामांना सामोरं जावं लागणार नाही. पण तरी सध्या असलेला स्टॉक संपविण्यासाठी या साइट्सकडूनसुद्धा भरगोस सूट दिली जाते आहे.