लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : औषधांसारख्या जीवनावश्यक वस्तूंना जीएसटीचा फटका बसू नये, यासाठी राष्ट्रीय औषध किंमत प्राधिकरणाने (नॅशनल फार्मास्युटिकल प्रायझिंग अथॉरिटी) रुग्णांना काहीसा दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे. ७६१ औषधांच्या किमती जीएसटी लागू झाल्यावरही १२ टक्क्यांनी नव्हे, तर केवळ २ ते ३ टक्क्यांनी वाढतील, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. या यादीत कर्करोग, हृदयरोग, एचआयव्ही, मधुमेह यांसारख्या दुर्धर आजारांवरील औषधांचा समावेश आहे. तर, अन्य असाध्य आजारांवरील औषधेही यात समाविष्ट आहेत. १ जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे. जीएसटीचा फटका एचआयव्हीबाधित, कर्करोग, हृदयरोग आणि मधुमेहींसह अन्य रुग्णांनाही औषधांच्या वाढीव किमतीच्या रूपात बसणार होता. ही अत्यंत महत्त्वाची बाब लक्षात घेऊन प्राधिकरणाने ७६१ औषधांच्या किमती जाहीर केल्या आहेत. जीएसटी लागू झाल्यावरही या औषधांच्या किमतीत केवळ २ ते ३ टक्क्यांनीच वाढणार आहेत. http://www.nppaindia.nic.in/order/List-27-06-17.pdf या प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर ७६१ औषधांच्या किमतीची यादी पाहता येईल.
जीएसटीचा भुर्दंड बसणार, पण कमी!
By admin | Published: June 30, 2017 1:55 AM