लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे/कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी देशातील विविध विमानतळांचे उद्घाटन करण्यात आले. यात पुण्यातील लोहगाव आणि कोल्हापूर येथील नवीन टर्मिनलचे दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आले. या नव्या टर्मिनलमुळे देशातील नागरिकांसाठी विमान प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केले.
यावेळी लोहगाव विमानतळ येथील कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दिलीप वळसे-पाटील, मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार उमा खापरे, भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, सुनील टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे, हवाई वाहतूक मंत्रालयाचे सहसचिव असंगबा चुबा आदी उपस्थित होते. तर, कोल्हापुरातील कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, माजी आमदार अमल महाडिक, विमानतळ प्राधिकरणाचे पीयूष श्रीवास्तव, प्रकल्प संचालक दिलीप सजनानी, के. डी. दास, विमानतळ व्यवस्थापक अनिल शिंदे उपस्थित होते.
कोल्हापुरातून बोइंग, जेट लवकरच झेपावणार : मुख्यमंत्री शिंदे
कोल्हापूरच्या विमानतळावरून लवकरच बोइंग आणि जेट विमानांचे उड्डाण होईल. रिजनल कनेक्टिव्हिटी स्किम किंवा व्हीजीएममधून या विमानतळाला कनेक्टिव्हिटी मिळेल, यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी कोल्हापूर विमानतळावर दिली. कोल्हापूर ते तिरुपती विमानसेवेला ३१ मार्चपासून प्रारंभ होईल, अशी गुड न्यूजही या कार्यक्रमात खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.
पुरंदर येथे लवकरच नवीन विमानतळ : फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुणे हे सांस्कृतिक, आयटी हब आहे. देश-विदेशातून अनेक नागरिक पुण्यात येतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांना सुविधा देण्यासाठी जुने टर्मिनल अपुरे होते. यामुळे नव्याने टर्मिनल उभे राहिले आहे. विमानतळांचे जाळे निर्माण करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे नवीन विमानतळ उभारण्यात येणार आहे. लवकरच त्यासाठीचे भूसंपादन सुरू करण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, महाराष्ट्राचे प्रेरणास्रोत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा इमारतीबाहेर उभारण्यात आला आहे. श्री विठ्ठलाचे म्युरल, वारली कला, देशी खेळ मल्लखांब आदींचे दर्शन या इमारतीत घडते. संस्कृतीला साजेसे वातावरण इमारतीत आहे.
हेरिटेज लूकचे विमानतळ
कोल्हापूरच्या ऐतिहासिक पाऊलखुणा, परंपरेला साजेसा असा हेरिटेज लूक कोल्हापूरच्या विमानतळाला देण्यात आला आहे. विमानतळात जाणाऱ्या प्रवासी कक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजदरबाराचे भव्य असे तैलचित्र संपूर्ण भिंतीवरच रेखाटले आहे.
छत्रपती शाहू महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि करवीरच्या संस्थापिका रणरागिणी ताराराणी यांचीही तैलचित्रे विमानतळावर रेखाटली आहेत. बॅग्ज क्लेम रूममध्ये करवीरनिवासिनी अंबाबाई आणि जोतिबाच्या भव्य प्रतिमा रेखाटण्यात आल्या आहेत.