ठाणे, दि. 30 - मुंबईप्रमाणेच ठाण्यालाही मुसळधार पावसाने मंगळवारी झोडपून काढल्यामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी जिल्हा प्रशासनाला दिले. पावसाचे पाणी तुंबलेल्या आणि नाल्यातली घाण रस्त्यावर आणि वस्तीत घुसलेल्या परिसराची सफाई जलदगतीने करण्याबरोबरच रोगराई पसरू नये यासाठी औषध फवारणी करण्याचे निर्देशही त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले. शिंदे यांच्या आदेशांनुसार महापालिकेने कारवाईला सुरुवात केली असून जेसीबी, पोकलेन आणि डम्परच्या साह्याने साफसफाईला सुरुवात करण्यात आली आहे.
पालकमंत्री शिंदे यांनी बुधवारी महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत आंबेवाडी, अंबिकानगर, वाल्मिकी पाडा, राजीव गांधी मार्केट, रतनबाई कंपाउंड, धर्मवीर नगर, जीलानी वाडी, हाजुरी आदी परिसराला भेट दिली. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नाल्यांमधील घाण वाहून आल्यामुळे घाणीचे साम्राज्य होते. श्री. शिंदे यांनी त्वरित जेसीबी आणि डम्परच्या साह्याने साफसफाई सुरू करण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे घाणीमुळे रोगराई पसरू नये, यासाठी संपूर्ण परिसरात औषध फवारणीचे आदेशही दिले आहेत.
पावसामुळे काही ठिकाणी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश श्री शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. काही ठिकाणी नाल्यांचे नुकसान झाले असून नाल्यांच्या भिंती तसेच नाल्यांवरील पुलांचेही नुकसान झाल्यामुळे याठिकाणी त्वरित दुरुस्तीची कामे हाती घेण्याचे निर्देशही श्री शिंदे यांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना दिले.
मंगळवारच्या पावसात धर्मवीर नगर आणि रामनगर येथे काही व्यक्ती नाल्याच्या प्रवाहात वाहून जाण्याच्या दुर्दैवी घटना घडल्या होत्या. श्री शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन शोध कार्य जोमाने सुरू ठेवण्याचे निर्देश दिले.