मयुरी चव्हाण: लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण: व्यासपीठावर सर्व पक्षांची राजकीय मंडळी एकत्र येतात तेव्हा हा सोहळा राजकीय कोपरखळयांनी रंगला नाही तर नवलच! कल्याण डोंबिवली शहरं राजकीय घडामोडींचे हॉट डेस्टिनेशन झालं आहे. सेना भाजपमधील कडवटपणा वाढल्यावर त्याचा परिणाम आत स्थानिक राजकारणावर देखील होऊ लागला आहे. मात्र अशा वातावरणात देखील डोंबिवलीमधील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात एकच हशा पिकला. आपले मनोगत व्यक्त करताना ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा उल्लेख खासदार असा केला. यावर मिश्किलपणे प्रतिक्रिया देत पाटील यांनी खासदार असा शबद पुन्हा उच्चारून प्रश्नचिन्ह निर्माण केले. यावर अवघे नाट्यगृह खळखळून हसले.
भिवंडी मतदार संघाचे भाजपाचे खासदार कपिल पाटील यांना केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. मंगळवारी सावित्रीबाई फुले नाट्यगृहात कल्याण डोंबिवलीतील विविध विकासकामांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विशेष उपस्थित ऑनलाईन लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला दिल्लीहुन कपिल पाटील हे देखील ऑनलाईन माध्यमातून उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी पाटील यांचा उल्लेख खासदार असा केला. यावर पाटील यांनी स्मित हास्य देत खासदार नाही असं सांगत अप्रत्यक्षरीत्या आपण आता केंद्रीय मंत्री आहोत अशी आठवण करून दिली. यावर एकनाथ शिंदे यांनीही मिश्किल प्रतिक्रिया देत पाटील यांचा उल्लेख पुन्हा केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री असा केला.यावेळी सभागृहात सेना भाजप कार्यकर्ते, पोलीस कर्मचारी , अधिकारी वर्ग यांच्यात एकच हशा पिकला होता.