पालकमंत्री की झेंडा मंत्री? राष्ट्रवादीचे मंत्री पालकमंत्रिपदांविनाच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 09:05 AM2023-08-11T09:05:23+5:302023-08-11T09:05:35+5:30
राज्य मंत्रिमंडळाचा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर विस्तार केला जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील मंत्र्यांना पालकमंत्रिपदांचे वाटप १५ ऑगस्टपूर्वी केले जाईल, असे मानले जात असताना आता केवळ झेंडावंदनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्र्यांना जिल्ह्यांचे वाटप करतील, अशी शक्यता अधिक आहे. पालकमंत्रिपदाचे वाटप आणखी लांबेल, असे दिसते.
राज्य मंत्रिमंडळाचा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर विस्तार केला जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. ४ ऑगस्टला अधिवेशन स्थगित झाले होते. तथापि, १५ ऑगस्टपूर्वी हा विस्तार होण्याची शक्यता नाही. त्यामुळे झेंडावंदनापुरते जिल्ह्यांचे वाटप मंत्र्यांना करावे लागणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांना अद्याप पालकमंत्रिपद मिळालेले नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री आहेत.
अन्य बरेच मंत्री असे आहेत की ज्यांच्याकडे दोन ते तीन जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद आहे. सूत्रांनी सांगितले की, पुणे, नाशिक, कोल्हापूर, रायगड, गडचिरोली, बीड, लातूर अशा जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद मागितले आहे. त्यातील नाशिक, कोल्हापूर आणि रायगडचे पालकमंत्रिपद देण्यास भाजप आणि शिवसेनेतूनही विरोध असल्याने तिढा निर्माण झाला आहे. त्यामुळेच पालकमंत्री पदांची घोषणा १५ ऑगस्टपूर्वी करण्याऐवजी झेंडावंदन मंत्र्यांची नावे जाहीर केली जाण्याची शक्यता अधिक आहे.
प्रतीक्षा मंत्रिमंडळ विस्ताराची
मंत्रिमंडळ विस्ताराची भाजप आणि शिवसेनेतील इच्छुकांना मोठी प्रतीक्षा आहे. मध्येच राष्ट्रवादीचे नऊ मंत्री झाल्याने या इच्छुकांना वेटिंगवर जावे लागले. त्यामुळे त्यांच्या पदरी निराशा आली असताना शिंदे-फडणवीस यांनी अधिवेशनानंतर विस्तार करू, असे म्हणत त्यांची आशा जिवंत ठेवली आहे.
समन्वय समितीची अद्याप बैठक नाहीच
भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांची एक समन्वय समिती महिनाभरापूर्वी स्थापन करण्यात आली होती. तिघांमधील मतभेदांची वा महत्त्वाच्या मुद्द्यांची जाहीर चर्चा इथे होणार होती. मात्र या समितीची अद्याप बैठक झाली नाही.