>> रवीन्द्र गाडगीळ चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा, अर्थात मराठी नववर्षाचा प्रारंभ. या दिवशी घरोघरी गुढी उभारण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. आपल्या प्रत्येक सणाला जसं आगळं महत्त्व आहे तसंच गुढीपाडव्यालाही आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जाणारा गुढीपाडवा आपल्याला आरोग्य रक्षणाचं, ऐश्वर्यवृद्धीचं आणि संस्कृती संवर्धनाचं महत्त्व पटवून देतो.
रेशमी झुळझुळीत वस्त्र, वर लावलेला चमकदार चांदीचा, तांब्याचा, स्टीलचा गडू, फुलांचा हार, कडुनिंबाची डहाळी, साखरमाळ, आंब्याची पानं उंच काठीला बांधून ती गुढी घराच्या दर्शनी भागात लावली जाते. आकाशाकडे तोंड असलेली गुढी आपल्याला मनाच्या, कर्तृत्वाच्या भराऱ्या मारायला शिकवते. sky has no limit! अर्थात आकाशाला मर्यादा नाहीत, तू स्वच्छंद विहार कर. ध्येय गाठायच्या मार्गात अनेक अडचणी, आकर्षणे येतील ती टाळून पुढे जा, असं ती सांगते. घरातील कर्ता पुरुष कुटुंबीयांसमवेत आनंदात गुढीची षोडशोपचार पूजा करतो. तिला दुपारी पुरणपोळी, गोडधोड, मिष्टांन्नाचा नैवेद्य दाखविला जातो. संध्याकाळी सूर्यास्ताच्या आत दुधाचा नैवेद्य दाखवून, आपल्या राष्ट्रध्वजाप्रमाणे गुढीला सन्मानाने उतरवले जाते!
गुढी ही विजयाची ग्वाही देते. शालिवाहन राजाने आक्रमक व अत्याचारी अशा शक, हुण लोकांवर आजच्या दिवशी मिळवला होता, त्या विजयाचे हे प्रतीक! हा राजा आपल्या महाराष्ट्रातील मराठवाड्यातील पैठण गावातील एक सामान्य गरीब कुंभाराने पालन केलेला मुलगा होता. सातवाहन वंशाचा कुलदीपक वीरपुरुष होता. आपल्या राज्यावर आलेल्या अचानक संकटात त्याने स्वत: गर्भगळित न होता, मृतवत तेजोहीन, बलहीन झालेल्या आपल्या सुस्त अशा प्रजेच्या मनात, शरीरात प्राण फुंकून राष्ट्रप्रेम, निष्ठा, कर्तव्य, आत्मभान, स्वाभिमान इ. सद्गुणांचे बीज रोवले. आपल्या मातीशी एकरूप राहणाऱ्या समाजाला एकत्रित करून आक्रमक सैन्य तयार केले व बलाढ्य शक राजांचा व सैन्याचा पराभव केला हे विशेष! जसा शिवरायांनी मावळ्यांना घेऊन तिन्ही बलाढ्य अत्याचारी शाह्यांचा पाडाव केला. तसेच राज्य शालीवाहनाचे उभे राहिले, म्हणून हा दिवस विजयाची गुढी उभारून हिंदूंचा नववर्षदिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.
महाभारतातल्या एका वसू राजाने कठोर तप केल्यावर त्याच्यावर देवकृपा झाली, त्याला तीन वस्तूंचा जो लाभ झाला त्यातील एक म्हणजे राजदंड, ज्यामुळे यशस्वी कारभाराचा श्रीगणेशा झाला. तेंव्हापासून कोणत्याही मिरवणुकीत, प्रमुख पिठाचे स्वामी, अध्वर्यु, पिठाधिपती, आदि शंकराचार्य यांचेपुढे तसेच न्यायपालिका, संसद, सभा, विधिमंडळ, कीर्तनोत्सव, दिंडी, सोहळा, इ. मिरवणुकीत राजदंड हा लागतोच. दंड म्हणजे शासन, शिस्तीचा बडगा, शिक्षा, धाक, अधिकार, हक्क, वकुब, नियम, वचक, शिस्त, दबाव हा दंड दाखवतो. ह्याच दंडाला मग रेशमी वस्त्र गुंडाळले गेले व वर चांदीची वज्रमुठ लागली. तोच हा विजयस्तंभ त्याचीच गुढी झाली.
प्रभू रामचंद्र, जे राजगादी सोडून तब्बल १४ वर्षांनंतर बलाढ्य रावणावर विजय प्राप्त करून अयोध्येला परत आले तो हाच दिवस! ज्या दिवशी प्रजेने ‘विजय पताका श्रीरामाची फडकते अंबरी, प्रभू आले मंदिरी’ म्हणत आपल्या राजाचे श्रीरामाचे स्वागत केले. त्याचीच आठवण म्हणून आजही हा विजयदिवस आनंदाने व उत्साहाने भारतभर साजरा केला जातो.
हिंदू संस्कृतीवर आजवर अनेक आक्रमणे झाली, परंतु तिची पाळेमुळे घट्ट असल्याने परकीयांचे प्रयत्न नेहमीच असफल ठरले. मोगलांची धर्मद्वेषी आक्रमक अत्याचारी ७०० वर्षे, शक, हुण, डच, पोर्तुगीज आक्रमणे, इंग्रजांची १५० वर्षे जुलुमी राजवट पचवूनही आपली संस्कृती अमर राहिली.
गुढीपाडव्याचा आरोग्य मंत्र!
गुढीचा नैवेद्य म्हणून कडुनिंबाची कोवळी पाने, गूळ, साखर, मिरे, जिरे, ओवा, हिंग, मीठ यांचे मिश्रण वाटून एकजीव करून प्रत्येकाला थोडा थोडा प्रसाद खायला देतात. तो यासाठी की वर्षाची, दिवसाची किंवा आयुष्याची सुरुवात जरी कडू झाली, तरी शेवट गोड व्हावा हा संदेश यातून मिळतो. तसंच, आयुष्यात येणाऱ्या कटू अनुभवाचा घोटही आपल्याला रिचवता यायला हवा, हे ह्या प्रसादाचे मर्म आहे.
निंबाचा पाला, जो वर्षभर आपल्या नजरेसही पडत नाही, तो वर्षारंभी घेण्याचे काय कारण असेल? तर त्यातही पर्यावरणाचा संदेश आहे. `झाडे लावा, झाडे जगवा!' निंब हे प्राणवायू पुरवणारे झाड आहे. त्याची पाने हवा शुद्ध करतात. पूर्वी महामार्गावर किंवा गावांच्या दुतर्फा हीऽऽऽमोठ्ठा घेर असलेली निंब, चिंच, आंबा, वड, पिंपळ, सागाची झाडे असायची. ही झाडे लावून त्याचे संवर्धन केले जाई. ह्या वृक्षांखाली थंडगार सावली मिळायची. शिवाय लाकूडफाटा, सरण, बांधकामासाठी लाकूड, पाचोळ्याचे खत, फळे-फुले, पाने देणारे ते जणू कल्पवृक्षच असायचे! पण आता पाश्चिमात्य विचारांनी घुसखोरी करून, आपल्या संस्कृतीची व पर्यावरणाची सुप्तपणे हानी चालवली आहे.
निंबाची पाने काविळीत औषध म्हणून खातात. चिरतरुण व सुंदर राहण्यासाठी निंबाच्या पानांचे सेवन करा, असा आयुर्वेदाने उपाय सुचवला आहे. लिंबाचा पाला बकऱ्यांना चारा म्हणूनही खाऊ घालतात. पक्षी निंबोळ्या खातात व चोचीबरोबर किंवा विष्ठेबरोबर त्याचे बीजारोपणही करतात.
मिष्टान्न भोजन करून आपण वर्षाची गोड सुरुवात करतो. एकमेकांना शुभेच्छा, अभिनंदन, आशीर्वाद देतो. ह्या दिवशी पंचांगवाचन व पंचांगपूजनही केले जाते. वर्षफल, संवत्सर फळ ऐकले जाते. मानवी मनाला भविष्याची ओढ असते, म्हणून तर तो भूतकाळचा प्रदीर्घ अनुभव गाठीशी घेऊन भविष्याचा वेध घेण्यासाठी वर्तमानात अथक चालतो. पुढे काही अस्मानी सुलतानी अघटित चांगले वाईट घडणार असेल तर स्वत:ची, समाजाची, राष्ट्राची मानसिक, शारीरिक, आर्थिक बाजू वेळीच भक्कम करून ठेवण्यासाठी त्याची धडपड असते. `होनी को कौन टाल सकता है भला!' तरी पण छोटीसी आशा, जगण्याची आशा! त्यावरच तर माणूस जगतो ना! नेहमी सावध असावे. त्यासाठी हे वर्षफल ऐकले किंवा वाचले जाते.
शहरांमध्ये नोकरीच्या रोजच्या कंटाळवाण्या धबडग्यातून वेळ काढून तरुणवर्ग ह्या दिवशी नववर्षाचे स्वागत शोभायात्रेने करतो. ढोलताशा वाजवत पारंपरिक वेशभूषेत नाचत-गात, संपूर्ण रस्ताभर भव्य रांगोळ्या काढून, भगवा ध्वज उंचावीत विशाल मिरवणुकीत सामील होतात. वर्षभरासाठी उत्साहाचे चार्जिंग करतात. तसेच, आपली परंपरा, संस्कृती, संस्कार या मॉडर्न युगातही आम्ही राखून आहोत, हे ते दाखवून देतात. तो सोहळा फारच विलोभनीय असतो. यंदाचा गुढीपाडवा महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला आनंददायी ठरो आणि आपले सर्व संकल्प सिद्धीस जावोत, ही सदिच्छा!