पिंपरी : लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. निवडणुकपुर्वी केलेल्या सर्व्हेच्या आधारे, तसेच मतदारांचा कल लक्षात घेऊन विविध संस्था निवडणुकीत कोणत्या पक्षाला बहुमत मिळेल, कोणता पक्ष दुसºया क्रमांकाची मते मिळवेल, याचा अंदाज व्यकत करत असतात. गंडे, दोरे, ताईत देऊन मंत्र तंत्र विद्या अवगत असल्याचे भासविणारे बाबा, महाराजही निवडणुकीच्या निमित्ताने सक्रिय झाले आहेत. गतवेळी अचूक भाकीत केले, महाराजांनी केलेले भाकीत तंतोतत खरे ठरले. असे दावे केले जातात. अशा भविष्यवेत्यांना आणि ज्योतिषां नामहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने यावेळी खुले आव्हान दिले आहे. लोकसभा निवडणुकीचे अचूक भाकित सांगा अन् २१ लाखांचे बक्षिस मिळवा. असे हे आव्हान दिले असून यास कोणी प्रतिसाद देतो का याची अंनिसला प्रतिक्षा आहे. महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी अंधश्रद्धा निर्मुलन समितीची आव्हान देण्यामागील भूमिका विशद केली आहे. विविध प्रकारची भाकित करून नागरिकांची दिशाभूल करणारे अनेक ज्योतिषी तसेच भविष्यवेते ठिकठिकाणी कार्यरत आहेत. निवडणूक झाल्यानंतर आम्ही केलेला दावा तंतोतंत खरा ठरला, असे म्हणणारे भविष्यवेते देशात आणि राज्यात अनेक आहेत. निवडणुकीपुर्वी मात्र निवडणुक निकाल असा लागेल, याचा अचूक अंदाज देण्याचे धाडस कोणी दाखवत नाही. निवडून आलेल्या उमेदवारांपैकी अमूक उमेदवार आमच्या संपर्कात होते, त्यांना निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी आपलीच मंत्र तंत्र विद्या कामी आली. असे सांगून आपली पाठ थोपाटणारे अनेक भोंदू बाबाही अनेक आहेत. त्यांचे निवडणूक निकालाचे अंदाज चुकल्यास भोंदुगिरी उघड होईल, या भितीने अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे आव्हान स्विकारण्याचे धाडस करण्यास कोणीही पुढे येईना. अशी सद्यस्थिती आहे. निवडणूक जिंकण्यासाठी वाट्टेल ते करण्याची काही उमेदवारांनी तयारी ठेवलेली असते. साम,दाम,दंड,भेद या तंत्राचा अवलंब केला जातो. त्याचबरोबर महाराज, बाबांच्या संपर्कात राहून गंडे दोर, मंत्र तंत्र विद्येचा उपयोग करून घेण्याचाही काही उमेदवार केविलवाना प्रयत्न करताना दिसून येतात. अगदी उमेदवारी अर्ज कोणत्या महुर्तावर,कोणत्यावेळी भरणे शुभ आणि लाभदायक ठरू शकते, याबद्दलचेही मार्गदर्शन महराजांकडून घेतले जाते. त्यानंतरच पुढील प्रचाराची तयारी केली जाते. निवडणूक काळात महाराज, बाबांची चलती आहे.
झाकली मूठ ...सव्वा लाखांची
अंनिसने ज्योतिषांना निवडणूक निकाल अंदाज अचूक वर्तविण्याचे आव्हान केले आहे. चूक झाल्यास नामुष्की ओढवणार या भितीने भविष्यवेते झाकली मूठ सव्वा लाखाची या उक्तीप्रमाणे अंनिसचे आव्हान पेलण्यास पुढे सरसावत नाहीत. नागरिकांमध्ये अंधश्रद्धा पसरविण्याचा बुरखा फाडण्याची हिच योग्य वेळ असते. हे लक्षात घेऊन निवडणुकीचे अचूक अंदाज द्या, २१ लाखांचे बक्षिस मिळवा. असे आव्हान ज्योतिष आणि भविष्यवेत्यांसाठी अंनिसने केले आहे. प्रतिसाद मिळणे अशक्य आहे, असा विश्वास अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यकत केला आहे.