यदु जोशी - मुंबई
‘गोपीनाथ मुंडे राज्य सांभाळतील आणि मी केंद्रात राहीन’, असे नितीन गडकरी यांनी जाहीर केले होते; पण आता मुंडेंच्या अकाली निधनानंतर गडकरींना राज्यात लक्ष घालण्यास भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी सांगितल्याची विश्वसनीय माहिती आहे.
प्रदेश भाजपाचे सर्व निर्णय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असत. येत्या तीन-चार दिवसांत याबाबतची भूमिका भाजपा नेतृत्वाकडून स्पष्ट केली जाईल, असे संकेत आहेत. गडकरींच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे व माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सामूहिक नेतृत्व राहील. या चौघांनी मिळून निर्णय घेऊन गडकरींच्या मार्गदर्शनाखाली त्याला अंतिम स्वरूप द्यायचे, अशी रचना राहील. राजीव प्रताप रुडी हे महाराष्ट्रासाठी केंद्रीय भाजपाचे प्रभारी आहेत. प्रभारीपद यापुढेही कायम राहील. भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी लवकरच नवीन चेहरा येणार आहे. नवीन कार्यकारिणीत महाराष्ट्रातील नेत्याला महत्त्वाचे पद दिले जाईल. केंद्रीय आणि राज्य नेतृत्वात समन्वय राखण्याची जबाबदारी प्रभारींबरोबर त्यांच्याकडेही असेल, असे सूत्रंनी सांगितले. महायुतीमध्ये शिवसेना आणि अन्य पक्षांशी चर्चा करण्याची जबाबदारी कुण्या एका व्यक्तीवर सोपविण्याऐवजी फडणवीस, खडसे, तावडे अन् मुनगंटीवार यांच्याकडे असावी, असा विचारही समोर आला आहे.
स्वत: मुंडे यांच्या उपस्थितीत 1 जून रोजी रात्री मुंबईत भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक झाली होती. वरील चौघांनी महायुतीतील मित्रपक्षांशी विधानसभा निवडणूक जागावाटपाची चर्चा करण्यासाठी रणनीती ठरवावी, असे त्या बैठकीत निश्चित करण्यात आले होते.
मुंडे यांच्या उंचीचा ओबीसी नेता भाजपाकडे नाही. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील एखाद्या नेत्याला त्या दृष्टीने प्रोजेक्ट केले जाण्याची शक्यता कमी आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि गडकरी यांच्यात फारसे सख्य नाही. मात्र आता बदललेल्या परिस्थितीत दोन्ही नेत्यांना एकत्र आणणो महायुतीच्या हिताचे राहणार आहे. आपण स्वत: त्या दृष्टीने प्रय} करू, असे प्रदेश भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.
गडकरींकडे मुंडेंची खाती
गोपीनाथ मुंडे यांच्याकडील खात्यांचा अतिरिक्त कार्यभार केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. राष्ट्रपती भवनानतर्फे त्याबाबतचे पत्रक जारी झाले आहे. त्यानुसार मुंडे यांच्याकडील ग्रामीण विकास, पंचायत राज्य, पेयजल आणि मलनि:स्सारण या खात्यांचा अतिरिक्त कार्यभार रस्तेविकास गडकरींकडे सोपविण्यात आला आहे.