लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अनैतिक मानवी तस्करी आणि बालकांवरील लैंगिक अत्याचाराचे गुन्हे रोखण्यासाठी गोपनीय माहिती कशी गोळा करावी, अटक आरोपींना शिक्षा होईल, या अनुषंगाने भक्कम पुरावे कसे गोळा करावे, पुराव्यांची मालिका कशी उभी करावी, याबाबत मोलाचे मार्गदर्शन पोलीस उपायुक्त (अंमलबजावणी) राजेंद्र दाभाडे व विविध सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी शहरातील पोलिसांना केले.आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या आवारातील प्रेरणा हॉलमध्ये विशेष मार्गदर्शन शिबिर आणि चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्याला शहरातील सर्व पोलीस ठाण्यांमधील पोलीस निरीक्षक (गुन्हे) आणि बालकल्याण अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या वेळी उपायुक्त दाभाडे यांच्यासह प्रेरणा या सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते प्रवीण पाटकर, प्रीती पाटकर, बालकल्याण समितीचे सदस्य श्याम गोरड, गणेश चौधरी, नीलिमा चव्हाण, परिविक्षा अधिकारी स्नेहा जोशी, प्रतिभा ओव्हा, डोंगरी येथील बालगृहाच्या अधीक्षिका तृप्ती जाधव, रेनीटा मेनेजेन्स, अमरित कौर आदींची उपस्थिती होती.या चर्चासत्रात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा आणि लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण कायद्यान्वये दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचा तपास करताना, राहणाऱ्या त्रुटींबाबत सखोल चर्चा झाली. या वेळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी वक्त्यांना अनेक शंका, प्रश्न विचारले. मान्यवरांनी सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले.
बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी मार्गदर्शन
By admin | Published: June 05, 2017 5:14 AM