ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. १८ - अद्यापही पीक कर्जाचा लाभ न घेतलेल्या पात्र गरजू शेतकऱ्यांना बँकांनी तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना देतानाच ३१ जुलैपर्यंत कर्ज वाटप पूर्ण न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी दिले. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या खरीप पीक कर्ज आढावा बैठकीत ते बोलत होते.याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक एस. एस. मेहता यांच्यासह बँकांचे प्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते. ना. तिवारी म्हणाले की, वाशिम जिल्ह्यातील बँकांनी खरीप पीक कर्ज वितरणात चांगली कामगिरी केली आहे. मात्र अद्यापही काही बँकांच्या कर्ज वितरणाचे प्रमाण असमाधानकारक आहे. या बँकांनी ३१ जुलै २०१६ पर्यंत त्यांच्याकडे येणाऱ्या पात्र गरजू शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनानुसार वाशिम जिल्ह्यात खरीप पेरणीपूर्वी ७० टक्के पेक्षा अधिक पीक कर्जाचे वितरण पूर्ण करण्यात आले होते. जिल्हा प्रशासन व बँकांनी केलेल्या या कामगिरीचे ना. तिवारी यांनी यावेळी कौतुक केले. तसेच यापुढेही गरजू पात्र शेतकऱ्याला बँकांनी पीक कर्ज तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. कर्जवाटपातील दिरंगाई खपवून घेणार नाही, असा इशारा तिवारी यांनी दिला.
पीककर्ज वाटप पूर्ण न झाल्यास कारवाईचे निर्देश
By admin | Published: July 18, 2016 8:05 PM