पुणे : राज्यातील जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या गट ‘क’मधील सर्व संवर्गांतील पदे भरण्यात येणार आहेत. परंतु, यामधील वाहनचालक आणि गट ‘ड’मधील पदे वगळून उर्वरित पदे सरळसेवेमार्फत भरण्यात येणार आहेत. त्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना सोमवारी जाहीर करण्यात आल्या.
राज्यातील जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी नुकताच अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला होता. त्यानंतर सोमवारी गट ‘क’ सर्व संवर्गातील भरतीसाठी वयोमर्यादेत दोन वर्षांची सूट देण्यात आली आहे. तशा मार्गदर्शक सूचना राज्य प्रशासनाचे उपसचिव पो. द. देशमुख यांनी जारी केल्या आहेत. दरम्यान, या निर्णयामुळे खुल्या प्रवर्गासाठी ४०, तर मागासवर्गीयांसाठी ४५ वर्षे वयोमर्यादा विचारात घेतली जाणार आहे.
जिल्हा परिषदेतील कर्मचारी भरतीला येत्या जुलैअखेरीस सुरुवात केली जाणार आहे. कनिष्ठ सहायक या पदाकरिता यापूर्वी मॅट्रिक उत्तीर्ण अशी शैक्षणिक पात्रता होती. त्यामध्ये बदल करून आता या संवर्गासाठी पदवी परीक्षा उत्तीर्ण असावी लागेल.
काय म्हटलंय आदेशात- अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) सरळसेवेची पदे निश्चित करून ती भरण्याची दक्षता घ्यावी. - अनुसूचित क्षेत्रातील पदे स्थानिक अनुसूचित जमातीतील उमेदवारांमधून भरताना स्थानिक अनुसूचित क्षेत्रात काम करणारे बिगरअनुसूचित जमातीचे कर्मचारी अथवा बिगरअनुसूचित क्षेत्रात काम करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांच्या समायोजनेची प्रक्रिया ही नव्याने निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यापूर्वी पार पाडावी.