पुणे : बालेवाडी येथे इमारतीचा स्लॅब कोसळून ९ मजूर ठार झाल्याप्रकरणाची सखोल चौकशी करून यामध्ये दोषी आढळून आलेल्या बांधकाम व्यावसायिक व संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा गृह व नगररचना राज्यमंत्री रणजित पाटील यांनी केली. बालेवाडी येथे स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडण्यापूर्वीही काम करताना एका बांधकाम मजुराचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिक, पोलीस यंत्रणा व पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मिळून गुन्हा दाखल होऊ दिला नाही. पुन्हा त्याच ठिकाणी सुरक्षेची कोणतीही व्यवस्था न करता अनधिकृत मजल्याचे काम सुरू ठेवले होते, असा मुद्दा आमदार मेधा कुलकर्णी यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. कुलकर्णी यांनी सांगितले, ‘‘बांधकाम व्यावसायिकांनी, ठेकेदारांनी कामगारांच्या सुरक्षिततेसाठी पुरेशी खबरदारी घेतली नाही. त्यामुळे ९ बांधकाम मजूरांना नाहक जीव गमवावा लागला.’’ (प्रतिनिधी)>बाणेर, बालेवाडीसह शहरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध तसेच निकृष्ट बांधकाम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिक व ठेकेदाराविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी मेधा कुलकर्णी यांनी केली.आयुक्त कुणाल कुमार यांनी बालेवाडी दुर्घटना प्रकरणी बांधकाम विभागातील उपअभियंता दिलीप काळे, कनिष्ठ अभियंता प्रवीण कवठेकर व इमारत निरीक्षक अभिजित अंबेकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. खुलासा प्राप्त झाल्यानंतर कारवाईची दिशा निश्चित करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनानेही या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करण्याचे आश्वासन विधानसभेमध्ये दिले आहे.
दोषींवर कठोर कारवाई करणार
By admin | Published: August 03, 2016 12:48 AM