मुंबई : गुजरातहून निघालेले हृदय अवघ्या १ तास ३२ मिनिटांत मुंबईच्या रुग्णालयात पोहोचल्यामुळे एका ५८ वर्षीय पुरुषास जीवनदान मिळाले. मुंबईतील ही पाचवी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया असून राज्यात पहिल्यांदाच राज्याबाहेरून अवयव आणण्यात आला. महाराष्ट्रात पहिल्यांदाच प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी दान केलेला अवयव दुसऱ्या राज्यातून आणला गेला. नेहमी होणाऱ्या प्रत्यारोपणांमध्ये राज्यातील अन्य भागांतून दान केलेले अवयव आणले जातात. दुसऱ्या राज्यातून अवयव आणण्यासाठी दोन्ही राज्यांतून परवानगी घेणे बंधनकारक असते. स्वयंसेवकांच्या नेटवर्कमधून सुरत येथील महावीर रुग्णालयातून हृदय मिळू शकते, असे फोर्टिस रुग्णालय आणि विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीला समजले. त्यामुळे समन्वय समितीने सकाळी साडेदहाला गुजरातच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधला, असे समन्वय समितीकडून सांगण्यात आले. आरोग्य विभागाशी संपर्क साधल्यावर त्यांना हृदय मुंबईत आणण्यास परवानगी मिळेल का, असे विचारण्यात आले. त्यानंतर त्यांनी गुजरातमध्ये हृदयासाठी प्रतीक्षा यादीत कोणी आहे की नाही, हे तपासून पाहिले. त्यानंतर पुढच्या गोष्टींची पूर्तता करण्यात आली. त्यादरम्यान दुपारी ‘नॅशनल आॅर्गन अॅण्ड टिश्यू ट्रान्सप्लाण्ट आॅर्गनायझेशन’शी संपर्क साधण्यात आला. त्यांनीही हृदय गुजरातहून मुंबईत आणण्यास परवानगी दिली. सायंकाळी साडेसातच्या सुमारास गुजरातच्या आरोग्य विभागाने परवानगी दिली. त्यानंतर पुढच्या साडेतीन तासांत हृदय मुंबईत आणण्याची तयारी झाल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले. शुक्रवारी रात्री १२ वाजून ८ मिनिटांनी हृदय रुग्णालयात पोहोचले. त्यानंतर ५८ वर्षीय पुरुषावर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली. हा रुग्ण गेल्या काही महिन्यांपासून रुग्णालयात उपचार घेत होता. पण गेल्या १० दिवसांपूर्वी त्याची प्रकृती खालावल्याने तो रुग्णालयात दाखल होता. त्या रुग्णाला कार्डिओमयोपॅथी झाल्याचे निदान झाले. कार्डिओमयोपॅथीत हृदयाचे स्नायू, रक्तवाहिन्या कडक होतात. त्यामुळे हृदयाच्या रक्तप्रवाहावर परिणाम होतो. रक्ताभिसरण थांबते. त्यामुळे अशा रुग्णांना हृदय प्रत्यारोपण हा अंतिम पर्याय असतो. ‘डोनेट लाइफ’चे विभागीय संचालक नीलेश मंडलेवाला यांनी ४८ वर्षीय पुरुषाच्या नातेवाइकांना अवयव दान करण्यासाठी समुपदेशन केले. त्यामुळे सुरतच्या ४८ वर्षीय पुरुषाच्या नातेवाइकांनी हृदय दान करण्याचा निर्णय घेतल्याने या रुग्णास जीवनदान मिळाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. ४७ वर्षांनंतर पहिल्यांदाच मुंबईत झालेली पहिली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आमच्या रुग्णालयात झाली होती. त्याचप्रमाणे दुसऱ्या राज्यातून अवयव आणून झालेली पहिली प्रत्यारोपण शस्त्रक्रियाही आमच्या रुग्णालयात झाली याचा आनंद आहे. सगळ्यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे. भविष्यातही अवयवदानाचा, हृदयदानाचा टक्का वाढल्यास अनेकांना जीवनदान मिळू शकते, असे फोर्टिस रुग्णालयाच्या संचालिका डॉ. एस. नारायणी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)असा झाला हृदयाचा प्रवास... रात्री १० वाजून ३६ मिनिटांनी सुरतच्या महावीर रुग्णालयातून प्रवास सुरू झाला. वेगवान प्रवासात २६९ किलोमीटरचे अंतर १ तास ३२ मिनिटांत कापले. पहाटे ३ वाजून ४५ मिनिटांनी हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.कुठे करण्यात आला होता ग्रीन कॉरिडोर? एअरपोर्ट आणि ट्रॅफिक अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन चार्टड फ्लाइटसाठी सुरत ते मुंबई अवकाश मार्गावर ग्रीन कॉरिडोर केला होता. मुंबईत एअरपोर्टच्या गेट क्रमांक ८ पासून ते फोर्टिस रुग्णालय या मार्गावर ग्रीन कोरिडोर करण्यात आला होता. सांताक्रूझ विमानतळ गेट क्रमांक ८ - मिलिटरी रोड - सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड - छेडा नगर ते ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे - ऐरोली जंक्शन - फोर्टिस रुग्णालय, मुलुंड
गुजरातचे हृदय मुंबईच्या मदतीला धावून आले
By admin | Published: December 20, 2015 3:01 AM