पालघर : ‘गुजरातमधून दुधाचा एकही थेंब मुंबईला जाऊ दिला जाणार नाही,’ हा गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांचा दावा फोल ठरला असून, सोमवारी सौराष्ट एक्स्प्रेसला जोडलेल्या दोन टँकरमधून ८० हजार लीटर दूध मुंबईकडे रवाना झाले. याच वेळी स्वाभिमानी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी हे तारापूरमध्ये आंदोलन करीत होते. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात स्थानिक दुधाचाच वापर होत असल्याने आंदोलनाचा परिणाम जाणवला नाही.राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना भाववाढ मिळावी, या स्वाभिमानी संघटनेच्या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने, खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी संघटनेने सोमवार (१६ जुलै)पासून राज्यभर आंदोलन सुरू केले. हे आंदोलन थोपवण्यासाठी शासनाने कर्नाटक आणि गुजरातमधून दुधाची आयात सुरू केली होती. या पार्श्वभूमीवर गुजरातमधील पाटीदार समाजाचे युवा नेतृत्व हार्दिक पटेल यांनी खासदार राजू शेट्टी यांना फोन करून, त्यांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवित आमचे कार्यकर्ते गुजरातमधून मुंबईला जाणारे दूध रोखून धरतील, असे आश्वासित केले होते. दररोज पोरबंदर येथून मुंबईकडे जाणाºया सौराष्ट्र एक्स्प्रेसला टँकर जोडून गुजरातमधून दूध मुंबईला पाठविले जाते. सोमवारी ही गाडी बोईसर येथे आल्यावर बोईसर, पालघर, सफाळे आदी रेल्वे स्थानकांवर आंदोलक आंदोलन करतील, या शक्यतेमुळे पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. त्यामुळे ४ वाजून ५५ मिनिटांनी एक्स्प्रेस पालघर येथे आल्यानंतर कुठलेही आंदोलन झाले नाही. या गाडीला जोडलेले ४० हजार लीटर्स क्षमतेचे २ टँकर मुंबईकडे रवाना झाले. तर तारापूरजवळील अमूल डेअरीजवळ राजू शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले.>‘स्वाभिमानी’चा प्रयत्न पाडला हाणूनकसारा : मुंबईला सर्वाधिक दूधपुरवठा संगमनेर, नाशिक, त्र्यंबकेश्वर आदी भागांतून होत असल्याने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घोटी टोल नाक्यावर आंदोलन करण्याचे निश्चित केले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी घोटी टोलनाक्यावरील आंदोलनाचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. दरम्यान, आंदोलकांनी कसारा घाटात दूध टँकर अडवून टायरमधील हवा काढण्याचा प्रयत्न करणाºया पाच आंदोलकांना कसारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.>गळक्या टाक्यांमुळे दूध वायासौराष्ट्र मेल एक्स्प्रेस गाडीला जोडण्यात आलेले दूध टँकर हे गळके असल्याने, हजारो लीटर्स दूध वाया जात असल्याचे दिसून आले. तर पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी गुजरातमधून एकही थेंब मुंबईत नेण्यात येणार नाही, या दाव्यानंतर मुंबईकडे आलेली सौराष्ट्र एक्स्प्रेस गाडीचे इंजिनच अमूल दूध कंपनीच्या पोस्टरने गुजरात सरकारने मुद्दाम सजवून पाठविले होते की काय? अशी चर्चा रेल्वे स्थानकात उपस्थित प्रवाशांमधून होत होती.>मराठवाड्यात संमिश्र प्रतिसादआंदोलनाच्या पहिल्याच दिवशी मराठवाड्यात संमिश्र प्रतसाद मिळाला. लातूर, जालना, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही.
गुजरातचे दूध रेल्वेने आले मुंबईला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 4:18 AM