मुंबई : सरकारी नोकऱ्यांमध्ये पाच टक्के आरक्षण मिळावे, यासाठी राजस्थानमध्ये गुज्जर समाजाकडून करण्यात आलेल्या आंदोलनाचा पश्चिम रेल्वेला फटका बसला आहे. सोमवारपर्यंत या मार्गावरून धावणाऱ्या तब्बल २२ मेल-एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या असून मुंबईहून जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पश्चिम मध्य रेल्वेच्या कोटा मंडळाअंतर्गत डुमरिया तसेच फतेहसिंहपुरा स्टेशनदरम्यान हे आंदोलन केले जात असून, त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या मेल-एक्सप्रेस गाड्यांना फटका बसला आहे. अनेक ट्रेन तर नागदा, निशातपुरा, बिना, झांसी, मथुरा, कोटा, आग्रा मार्गे अनेक रद्द वळविण्यात येत आहेत. २२ ते २४ मे दरम्यान मुंबईतून सुटणाऱ्या १५ ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर सोमवारी २५ मे रोजी आणखी ७ ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे पश्चिम रेल्वेचे आर्थिक नुकसान झाले. दरम्यान, रद्द झालेल्या ट्रेनमधील आरक्षण केलेल्या प्रवाशांना तिकिटांचा परतावा देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नितीन डेव्हीड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
गुज्जर आंदोलनाने रेल्वेला फटका
By admin | Published: May 25, 2015 3:51 AM