कोल्हापूर : गुजरात असहिष्णुतेची जन्मभूमी आहे. सन २००२नंतर तेथे विविध मार्गाने विचार दडपण्याचे प्रकार वाढत आहेत. अलीकडे पोषक वातावरण असल्यामुळे देशभर असहिष्णुतेची धार वाढते आहे, असे मत गुजरातमधील लेखक, साहित्यिक यांनी गुरुवारी येथील पत्रकार परिषदेत व्यक्त केले. पुरस्कार वापसी करून विचारवंत आपल्या भावना व्यक्त करीत आहेत, असे त्यांनी सांगितले.सहिष्णुता आणि असहिष्णुता यासंबंधी देशभरात निर्माण झालेल्या प्रश्नांसंबंधी लोकभावना समजून घेण्यासाठी ‘दक्षिणायन’ मोहिमेंतर्गत गुजरातमधील लेखकांचा महाराष्ट्रात जत्था आला आहे. येथील गायन समाज देवल क्लबमध्ये त्यांची पत्रकार परिषद झाली.सिनेनिर्माते परेश नायक म्हणाले, ‘गुजरातमध्ये जन्मलेल्या असहिष्णुतेने २००२ ते २०१५ या कालावधीत टोक गाठले आहे. विचार स्वातंत्र्यावरच घाला घातला जात आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, अॅड. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येनंतर देशभर असहिष्णुतेची लाट पसरली आहे. सामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे असहिष्णुतेच्या विरोधात विचारवंत विरोध करीत आहेत. हत्या झालेल्या नेत्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे.’डॉ. गणेश देवी म्हणाले, ‘असहिष्णुतेसंबंधी निर्माण झालेल्या लोकभावना समजून घेण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यांत आम्ही साहित्यिक दौरा करीत आहोत. गुजरात असहिष्णुतेची कार्यशाळा आहे. वेगळा विचार मांडणाऱ्या विचारवंतांची हत्या करणे, हे चिंताजनक आहे.’ यावेळी अनिल जोशी (गुजरात), प्रवीण बांदेकर, गणेश विसपुते (सावंतवाडी), प्राचार्य राजेंद्र कुंभार, संजीव खांडेकर(मुंंबई) यांनी विचार मांडले. यावेळी मेघा पानसरे, राजा शिरगुप्पे, धनाजी गुरव, उदय नारकर, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)संघ, भाजपाकडून असहिष्णुतेला प्रोत्साहनगुजरात नवनिर्माण आंदोलनाच संस्थापक मनीष जानी म्हणाले, ‘गेल्या बारा वर्षांपासून गुजरातमध्ये असहिष्णुता आहे. असहिष्णुतेच्या प्रयोगशाळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा प्रोत्साहन देत आहेत.’दबाव नसलेला एक मिनिट नाही...शासनाकडून मिळालेला पुरस्कार तुम्ही परत केल्यानंतर, शासन व अन्य घटकांकडून दबाव येत आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना देवी म्हणाले, दबाव नसलेला एक मिनिटही नाही. जो भितो तो क्षणाक्षणाला मरत असतो. ज्याला भीती नाही, तो मरत नाही. दबावाला बळी न पडता, आमचे काम सुरू आहे.
गुजरात राज्य असहिष्णुतेची जन्मभूमी!
By admin | Published: November 27, 2015 3:15 AM