Maharashtra News: महायुती सरकार स्थापन झाले असून, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता सगळ्याचं लक्ष लागलं आहे, ते उपमुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार यांना कोणते खाते मिळणार? शिंदे यांच्याकडे गृह खाते असावे असा आग्रह शिवसेनेने धरलेला असल्याची चर्चा आहे. त्याला शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनीही दुजोरा दिला आहे.
"निर्णय घेण्याचा अधिकार एकनाथ शिंदेंना"
माध्यमांशी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, "एकनाथ शिंदे यांना गृह खातं मिळावं, यासाठी सगळ्याच आमदारांनी आग्रह धरलेला आहे. आम्ही तो आग्रह अजूनही सोडलेला नाही. पण, शेवटी यासंदर्भातील निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही एकनाथ शिंदे यांना दिलेला आहे."
खातेवाटपाबद्दल निर्णय होत नसल्याने मंत्रिमंडळ विस्तार लांबला असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
याबद्दल शंभूराज देसाई म्हणाले, "मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात चर्चा होईल. हे तिघेच याबाबतीतील निर्णय घेतील. सर्वच आमदार कधी मंत्रिमंडळ विस्तार होणार याची वाट बघत आहेत."
या खात्यांसाठी शिवसेना आग्रही
शिवसेनेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृह खात्या व्यतिरिक्त एकनाथ शिंदे यांनी महसूल, नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम ही खाती मागितीली आहे. त्यांनी फडणवीसांना सांगितले की, शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत ५७ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे ११ ते १३ मंत्रिपदे मिळणे अपेक्षित आहे, असे शिवसेनेच्या एका नेत्याने सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते कायम राहणार असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर इतर काही महत्त्वाची खाती मिळवण्याचे प्रयत्न अजित पवारांकडून केले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.