आपल्या मुलांनी मोठं व्हावं आणि आपलं नाव कमवावं हे प्रत्येक आई-वडिलांचं स्वप्न असतं. हे स्वप्न उराशी बाळगूनच पालक आपल्या मुलांचा सांभाळ करतात, त्यांना स्वप्ने दाखवतात, शिक्षण देऊन समाजात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देतात, मार्गदर्शन करतात. वडिल पोलीस दलात असलेल्या स्नेहल पाटील हिच्या आई-वडिलांनीही तेच स्वप्न पाहिलं होतं. लेकीनेही मोठ्या जिद्दीने ते स्वप्न सत्यात उतरवत पीएसआय पदाला गवसणी घातली. लेकीच्या अभिनंदनाचे बॅनर पाहून आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळ्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.
एमपीएससी परीक्षांचा निकाल गेल्या महिन्यात लागला. या निकालात स्नेहल जगदीश पाटील या विद्यार्थीनीची पीएसआयपदी निवड झाली. त्यामुळे, तिच्या कुटुंबीयांना मोठा आनंद झाला. स्नेहलचे वडिल पोलीस दलातच कार्यरत आहेत. त्यामुळे, पोलीसकन्या म्हणून तिच्यासाठी हे यश विशेष आहे. कारण, वडिलांनाच आदर्शन मानून स्नेहलने स्पर्धा परीक्षांतून पीएसआय होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. त्या स्वप्नाला सत्यात उतरवतत तिने आई-वडिलाच्या कष्टाचं चीज केलंय. त्यामुळेच, तिच्या अभिनंदनाचे बॅनर ती राहत असलेल्या भागात झळकले. तिचे हेच बॅनर पाहून आईच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळल्याच्या व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल झाला आहे.
वडीलांपाठोपाठ मुलगी सुद्धा पोलिस दलात दाखल झाली. मुलं आपल्या आई-वडिलांचं सर्वात जास्त अनुकरण करतात, मात्र वडिल म्हंटलं की जरा अंतर आलंच, असे म्हणत स्नेहलच्या आईचा व्हिडिओ इंस्टावरुन शेअर करण्यात आलाय. या व्हिडिओत तिची आई मुलीच्या कौतुकाचा बॅनर न्याहाळताना दिसत आहे. आईच्या चेहऱ्यावरील ते आनंदाचे भाव शब्दात टिपणे अवघडच आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, हळद लावायच्या आधी गुलाल लावून घ्या. मुलींनीही पोलीस खात्यात येण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, पीएसआय किंवा तत्सम पोलीस अधिकाऱ्यांच्या पोस्टसाठी तयारी आणि मेहनत करायला हवी. आपणास, प्रत्येक क्षेत्रात छत्रपती होता आलं पाहिजे, एवढे लक्षात ठेवा, असे स्नेहलन मेरीट यादीत नाव आल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हटले होते.