एसटी कामगार सहकारी बँकेत भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात पुण्यात आंदोलन करण्यात येत आहे. "सदावर्ते पती-पत्नीने बँकेचे कोट्यावधी रुपये लाटले आहेत. दोघांनाही तात्काळ अटक करा'', अशी मागणी करण्यात आली आहे.
पुण्यातील सहकार आयुक्त कार्यालयाबाहेर एसटी कामगार संघटनेचे गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. एसटी कामगार सहकारी बँकेत गुणरत्न सदावर्ते यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आशिया खंडात एक नंबर असलेल्या बँकेच वाटोळे करणारे सदावर्ते आणि त्यांच्या पत्नीला अटक करण्याची मागणी करत असल्याचे एस. टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले. संचालक मंडळाने बेहिशेबी कर्ज प्रकरण केले आहे. त्यांना अटक करा. आमच्या मुलांना गेल्या आठ महिन्यांपासून शिक्षण, लग्न याला कर्जे मिळत नाहीय. १५० कर्मचाऱ्यांची भरती करुन लाखो रुपयांचा मलिदा लाटला आहे, त्यांची चौकशी करून अटक करण्याची मागणी शिंदे यांनी केली आहे.
बँक आमच्या हक्काची आहे. सदावर्तेच्या पूज्य वडिलांची नाही. सहकार आयुक्तांनी त्यांचे संचालक पद रद्द केले आहे. त्यामुळे बँकेच्या कामात त्यांनी हस्तक्षेप करू नये. बँकेचे डेटा सेंटर करण्याचे काम सदावर्तेनी एका कंपनीला दिले असून त्या कंपनीमध्ये सदावर्तेचा काय सहभाग आहे, याचीही चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.