खासदार उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना साताऱा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सातारा न्यायालयाने सदावर्ते यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. ही मुदत संपत आल्याने सदावर्ते यांना आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.
दीड वर्षांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या गुन्ह्यात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने अॅड. सदावर्तेना दि. १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आज पुन्हा पोलिसांनी सदावर्तेंची पोलीस कोठडी मागितली होती. परंतू न्यायालयाने ही मागणी फेटाळली. याबरोबर बाहेर येताच गुणरत्न सदावर्तेंनी उदयनराजेंसारखी कॉलर उडवित घोषणाबाजी केली.
काय होते प्रकरण...मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर एसटीच्या कर्मचाºयांनी हल्ला केला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेऊन अटक केली होती. त्यावेळी सातारा पोलीस शहर ठाण्यातील गुन्ह्यात अॅड. सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी गेले होते. पण, अॅड. सदावर्ते यांना पोलीस कोठडी मिळाली होती. त्यामुळे पोलिसांना दोन दिवस थांबावे लागले होते. दीड वर्षापूर्वी एका वाहिनीवरती अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी खासदार उदयनराजे आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याप्रकरणी सदावर्ते यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. मात्र, त्यांना अटक झालेली नव्हती, असे पोलिसांनी सांगितले.