ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १ - ' सीमेची सुरक्षा करणा-या भारतीय जवानांना शत्रूंशी लढताना ज्या गोळ्या झेलाव्या लागतात त्या फिल्मी (खोट्या) नसतात, त्या ख-या असतात. सलमानला ज्या ( चित्रपटात) गोळ्या लागतात, त्या खोट्या, फिल्मी असतात, नंतर तो लगेच उभा राहतो' अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेता सलमान खानवर निशाणा साधला. 'पाकिस्तानी कलाकार म्हणजे काही दहशतवादी नाहीत, त्यामुळे त्यांना भारतात काम करण्यास बंदी घालणं योग्य नाही' अशी भूमिका सलमानने नुकतीच मांडली होती. त्याच पार्शवभूमीवर राज यांनी सलमानवर टीकास्त्र सोडले. 'टाईम्स नाऊ' चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सलमानचा खरपूस समाचार घेतला.
(पाकिस्तानी कलाकार म्हणजे दहशतवादी नाही - सलमान खान)
('ए दिल है मुश्किलचा मार्ग मोकळा? करणसाठी सलमानची राज ठाकरेंकडे मध्यस्थी)
- ' सलमानची ट्युबलाईट मधेमधे पेटत असते. ही लोक मुर्ख आहेत, त्यांना फक्त धंदा आणि स्वत:चा फायदा दिसतो' अशी टीका राज यांनी केली. ' हे कलाकार- कलाकार काय चालवलंय? मी स्वत:ही एक कलाकार आहे. कलाकार काय ढगातून पडतात का ? या पाकिस्तानी कलाकारांना आम्ही ४८ तासांत देश सोडून जाण्यास सांगितले होते. हे कलाकार भारतात काम तर करतात, पण जेव्हा त्यांना ' उरी' हल्ल्याबद्दल शोक व्यक्त करण्या सांगितले, तेव्हा त्यांनी सरळ नकार दिला. ते जर असं बोलू शकतात मग आपल्यालाच त्यांचा एवढा पुळका का? आपल्या कलाकारांनाच तिकडे का जायचयं? आज एम.एस.धोनी हा चित्रपट प्रदर्शित झाला, पण पाकिस्तानमध्ये त्यावर बंदी घालण्यात आली आहे ना? मग आपण तरी या लोकांना का सहन करायचं?' असा खडा सवाल विचारत राज ठाकरे यांनी पाकिस्तानी कलाकारांवर लादण्यात आलेल्या बंदीचे समर्थन केले.