मुंबई - राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) हे ३ दिवसीय दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी राहुल गांधी, सोनिया गांधींसह इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य ठाकरेंसह दिल्लीतील संजय राऊतांच्या निवासस्थानी मुक्कामाला होते. मात्र याच राऊतांच्या बंगल्यात गुप्ता ब्रदर्ससोबत ठाकरेंनी भेट झाली. ही भेट जवळपास अर्धा तास झाली या भेटीत काय झालं यावर प्रश्नचिन्ह आहे असं सांगत शिवसेना नेते संजय निरुपमांनी उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप केले आहेत.
कोण आहेत गुप्ता ब्रदर्स?
संजय निरुपमांनी पत्रकार परिषदेत गुप्ता ब्रदर्सची ओळख सांगत त्यांचे फोटो दाखवले. त्यात राजेश गुप्ता, अतुल गुप्ता आणि अजय गुप्ता यांचे फोटो दाखवले. हे तिन्ही गुप्ता मूळचे उत्तराखंडमधील आहेत. १९९२ मध्ये हे दक्षिण आफ्रिकेत बिझनेस करण्यासाठी गेले. त्याठिकाणी ते इतके मोठे व्यापारी बनले की तिथले राष्ट्रपतीही यांच्या उद्योगात भागीदार होते. हळूहळू दक्षिण आफ्रिकेत अब्जावधीचा डॉलरचा घोटाळा समोर आला. तेव्हापासून हे तिघे फरार आहेत. तिघांविरोधात इंटरपोलची रेड कॉर्नरची नोटीस आहे. या तिघांमधील अजय गुप्ता हे मास्टरमाईंड आहेत त्यांचे दक्षिण आफ्रिकेतील नव्या सरकारसोबत काही बोलणी झाली त्यानंतर त्यांचे नाव गुन्ह्यातून कमी झाले. मात्र राजेश गुप्ता आणि अतुल गुप्ता हे दोघे फरार आहेत. ते आता दुबईत राहतात. दोघांनी दुबईत व्यवसाय सुरू केलाय असं निरुपमांनी म्हटलं.
मात्र २०२२ मध्ये राजेश गुप्ता, अतुल गुप्पा यांना दुबईत अटक करण्यात आली होती. हे दोघेही बाहेर आहेत त्यांचा भारतात प्रवेश नाही. जर आले तर इंटरपोल नोटीसमुळे त्यांना अटक होईल. अजय गुप्ता हे भारतात आलेत. याच अजय गुप्तासोबत उद्धव ठाकरेंची भेट झाली का?, अजय गुप्ता बिझनेसमॅन कमी गुन्हेगार जास्त आहे. २५ मे रोजी देहरादूनमधील एका बिल्डरच्या आत्महत्येत अजय गुप्ताला अटक करण्यात आली. अजय गुप्ता आणि त्यांचे मेहुणे अनिल गुप्ता यांना देहरादूनचे प्रसिद्ध बिल्डर बाबा सहानी यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत आहेत. सहानी हे देहरादूनचे प्रसिद्ध बिल्डर आहेत. ते तिथे १५०० कोटींचा प्रकल्प बनवत होते. या प्रकल्पात पैशाची गरज होती त्यामुळे सहानी अजय गुप्ता-अनिल गुप्ता यांना सोबत घेतले. मात्र गुप्ता इतके शातीर होते की त्या दोघांनी सहानी यांची कंपनी हिसकावण्याचा प्रयत्न केला. १६ मे रोजी बाबा सहानी यांनी तिथल्या पोलिसांना पत्र लिहिलं, माझ्या जीवाला धोका आहे. अजय गुप्ता-अनिल गुप्ता मला कधीही मारू शकतात. त्यांना माझी कंपनी हडप करायची आहे असं म्हटलं होतं. पोलीस तपास करत होती त्यातच २४ मे रोजी बाबा सहानी यांनी मुलीच्या घरी जात तिच्या इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्यांच्या खिशात सुसाईड नोट होती त्यात अजय गुप्ता-अनिल गुप्ता यांचे नाव होते. उत्तराखंड पोलिसांनी तात्काळ या दोघांना अटक केली असं संजय निरुपम यांनी सांगितले.
अजय गुप्तांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट?
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला अजय गुप्ता हा ११ जुलैला जामिनावर बाहेर पडतो. उद्धव ठाकरे आतापर्यंत दिल्लीला गेले तेव्हा ते हॉटेल ताज किंवा हॉटेल मोर्या इथं थांबतात. मात्र यावेळी ते संजय राऊतांच्या घरी थांबले. राऊतांच्या घरी मुक्काम का असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. ताज किंवा मोर्या हॉटेलला थांबले असते तर अजय गुप्तांसोबतची भेट सर्वांना कळली असती त्यामुळे संजय राऊतांच्या घरी ठाकरेंनी मुक्काम केला का? मग तुम्ही अजय गुप्ता यांना भेटला की अनिल गुप्तांना?, गुप्ता यांच्या भेटीमागे तुमचा उद्देश काय होता? बाबा सहानी आत्महत्येत ठाकरे कनेक्शन आहे का?, गुप्ता बंधूंसोबत तुमचे काही व्यवहार आहेत का? असा सवाल संजय निरुपमांनी केला आहे.
उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
ठाकरे कुटुंबाचे मोठे व्यवसाय इंडिया बाहेर आहेत, फाईव्ह स्टार हॉटेल आहेत. लंडनमध्ये बंगला आहे त्यातील अर्धा भाग भाड्याने दिलाय. दक्षिण आफ्रिकेत तुमची गुंतवणूक होती का? या गुंतवणुकीत गुप्ता ब्रदर्सची काही भूमिका होती का? याची उत्तरे महाराष्ट्राला मिळाली पाहिजे. उद्धव ठाकरे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. राज्याचे प्रमुख विरोधी नेते आहेत. त्यामुळे अशा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या गुप्ता ब्रदर्स भेट का घेतली, त्या बैठकीत काय घडलं, डिल झाली हे सांगावे असं निरुपम यांनी मागणी केली.
नुकतेच निवडणूक आयोगाने शिवसेना उबाठा यांना देणगी घेण्याची परवानगी दिली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी फरार गुप्ता ब्रदर्सकडून फंड घेण्याचा प्रयत्न आहे का? बिल्डरांच्या दलालीसाठी संजय राऊत कुख्यात आहेत. पत्राचाळ घोटाळ्यात ते जेलला गेले होते. संजय राऊतांचे बऱ्याच बिल्डरांसोबत व्यवहार असतील. बाबा सहानी यांच्यासोबत काही व्यवहार होते का? गुप्ता ब्रदर्ससोबत काही व्यवहार होते? राऊतांच्या माध्यमातून ही भेट झाली. जामीनावर असलेल्या आरोपीची भेट घेण्याचा काय उद्देश आहे हे जनतेला सांगावे लागेल असं संजय निरुपमांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर गंभीर आरोप केले आहेत.