आज गुरुपौर्णिमा आहे. महाभारताचे रचेते महर्षी वेद व्यास यांची जयंती म्हणूनही हा सण साजरा केला जातो. तसेच, गुरुंप्रती ऋणनिर्देश करण्यासाठी देखील हा दिवस साजरा केला जातो. आयुष्याच्या विविध टप्प्यावर गुरु आपल्याला मार्गदर्शन करतात आणि आपल्या आयुष्याला सुयोग्य आकार देतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या गुरुंना म्हणजेच शरद पवारांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
"गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. मी जो काही आहे, ते माझे गुरु आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यामुळेच" असं म्हटलं आहे. जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. तसेच शरद पवार यांच्यासोबतचा एक फोटो देखील शेअर केला आहे.
"भारताच्या संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमेचे मोठे महत्व आहे. गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. ज्यांनी आपल्याला शिकवलं, घडविलं आणि ज्यांच्यामुळे आपण आज आहोत, त्यांना वंदन करण्याचा आजचा दिवस आहे. मी जो काही आहे, ते माझे गुरु आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यामुळेच. आदरणीय साहेबांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा" असं जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांच्याकडून देखील पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने या सगळ्या घटनेत आदरणीय शरद पवार यांच्याबरोबर राहणार असल्याची स्पष्ट भूमिका जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत मांडली. तसेच, देशातील ९ राज्यात पक्ष फोडाफोडीचं असं राजकारण भाजपाकडून होत असल्याचंही त्यांनी म्हटलं.
"मला खात्री आहे आज जो शपथविधी झाला त्याला ज्या सदस्यांना बोलावून घेण्यात आले त्यांच्या कशावर सह्या घेतल्या. अजून आम्हाला कळले नाही. पण त्यातले बरेच सदस्य जे टिव्हीवर त्या कार्यक्रमात दिसत होते त्या सर्वांनी शरद पवारांशी बोलून आम्ही गोंधळलो होतो ही भूमिका मांडली आहे. काहींनी माझ्याशी संपर्क साधला. त्या सर्व आमदारांचे कन्फ्युजन आहे."
"पवारांच्या पत्रकार परिषदेमुळे हे आता स्पष्ट झाले आहे की कृतीला शरद पवारसाहेबांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, फ्रंटलचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि महाराष्ट्राची कार्यकारिणी यांची ५ जुलैला दुपारी एक वाजता बैठक आदरणीय शरद पवारसाहेब यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे बोलावली आहे. आदरणीय शरद पवारसाहेब आपली स्पष्ट भूमिका स्पष्ट मांडतीलच" असेही जयंत पाटील यांनी सांगितले.